पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केल्याची माहिती, अजित पवार यांनी दिली. पुणे महानगरापालिकेनं बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकरांवर अप्रत्यक्ष तोफ डागली.


जिल्हाधिकाऱ्यांना सालगडी समजता का?

सत्ताधारी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना सालगडी समजतात का, असा सवाल अजित पवारांनी केला. भगवानगडातल्या भाषणाला आडकाठी केल्याचा आरोप करत नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची १२ तासात बदली करा, असं विधान महादेव जानकर यांनी केलं होतं.


मुख्यमंत्र्यांना सल्ला

अजित पवार म्हणाले, "येत्या 31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्र्यांनी सांगेन की, त्यांनी मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा. काही मंत्री म्हणतात की बारा तासात जिल्ह्याधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे. जिल्ह्याधिकारी म्हणजे काय सालगडी आहेत का?"

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत सरकार फक्त ठराव करतंय, बाकी काही नाही. बारामतीमधे काल दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. असे प्रकार वाढत आहेत, कारण पोलीस आणि कायद्याची भिती राहिलेली नाही. लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहे ते त्यामुळेच. कोपर्डीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीने फाशी द्या" अशी मागणी अजित पवारांनी केली.

पाण्याच्या टाक्यांवर भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई

पुण्यात पाण्याच्या टाक्यांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीत आज श्रेयवाद रंगला. वानवडी भागात पुणे महानगरापालिकेनं बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. मात्र, या कामात राज्य सरकारचाही वाटा असल्यानं मुख्यमंत्र्यांना आमंत्रण हवं होतं, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला.. आणि या कार्यक्रमाआधी काळी काळ आंदोलनही केलं.

अजित पवारांचा विरोधकांना चिमटा

दरम्यान जनतेच्या हिताच्या उपक्रमांमध्ये श्रेयवादाचं राजकारण करु नका, असं आवाहन करत अजित पवारांनी महापालिकेतल्या विरोधकांना चिमटाही काढला.