नांदेड : हायकोर्टाने परराज्यातून आयात केलेलं बीफ बाळगायला आणि खायला परवानगी दिल्यानं आता महाराष्ट्रातूनही बीफबंदी हटवण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

 
'महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. अशावेळी भाकड जनावरं सांभाळणं परवडणारं नाही. शिवाय सरकारही त्यांची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे भाकड बैल विकून चार पैसे खिशात येण्याची शक्यताही पार मावळून गेली आहे.' असं अजित पवार म्हणाले. दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी ते मराठवाड्यात आहेत.

 
'जर महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातून आणलेलं बीफ खायला परवानगी असेल तर सरकारच्या गोवंश हत्या बंदीला कुठलाही अर्थ उरत नाही' असं अजित पवार म्हणाले. 'महाराष्ट्रात बीफवर 1 कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे. तसंच चिकन, मटण महाग असल्यानं बीफमधून जे लोक आपलं पोट भरतात, किंवा त्यातून जी प्रथिनं मिळतात त्यावरही गदा आली आहे.' असंही अजित पवार म्हणाले.