मुंबई: एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Ajit Pawar) पक्षाच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. पुढील दोन दिवसात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या सहा ते सात मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पालकमंत्री पदाच्या वाटपासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. 


महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून काही ना काही कारणानं सरकारमध्ये कुरबुर सुरु असल्याचं दिसून येतंय. महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटला नाही. सातारा, पुणे, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गटासोबत अजित पवार गटही आग्रही असल्याचं कळतंय. अशातच अजित पवार गटाच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा केली. 


अजित पवार नाराज असल्याची चर्चा 


राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं टाळल्याचं दिसून आलं. तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. अजित पवार आजारी असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्यांचं सांगण्यात येतंय.


अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी त्यांच्या गटाच्या मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. पण या बैठकीलाही अजित पवार उपस्थित नसल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. 


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर 


मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे-फडणवीसही तातडीनं दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत शिंदे-फडणवीसांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरु असल्याची माहिती आहे. अजित पवार नाराज आहेत आणि पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचा दबाब वाढत चालला असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अचानक दिल्लीला रवाना झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. 


ही बातमी वाचा: