मुंबई :  पक्षप्रवेशाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप शिवसेनेला आव्हान दिले आहे. मराठीत म्हण आहे काट्याने काटा काढतात. त्यांनी सुरुवात केली आहे आता आम्ही शेवट करणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  काही लोक तिकडून आमच्याकडे येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.  तर आघाडीची अधिकृत घोषणा 2 ऑक्टोबरला होणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.


आज दौलत दरोडा आणि भारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं. संजय राऊत शरद पवारांना भेटल्यानंतर वरळीतून राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही अशी चर्चा होती. मात्र अजित पवारांनी त्याचं खंडन केलं आहे.

गोपीनाथ मुंडे वारल्यावर पवार साहेबांनी उमेदवार दिला नव्हता. मात्र  ही पंचवार्षिक निवडणूक आहे. इथं वेगळी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण लढवणार नसतील तर ती जागा राष्ट्रवादीची असल्यानं आम्ही लढवणार आहोत, लवकरच उमेदवार जाहीर होईल, असे ते म्हणाले.

आघाडी इस बार 175 पार असे सांगताना अजित पवार  म्हणाले की, बारामतीचा उमेदवार कमीत कमी एक लाख मतांनी निवडून येईल. गोपीचंद जबाबदार कार्यकर्ते आहेत, तुल्यबळ उमेदवार आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, मी अक्षयशी बोललो, तेंव्हाच सांगायचं होतं तिकीट घोषित करू नका.विमलताई हयात नाही म्हणून हे झालं. किमान हे लवकर केलं. नंतर एबी फॉर्म दिल्यावर केलं असत त्रास झाला असता, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणूक लढवण्याच्या मनसेच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, माझं राज ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणं झालं असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर आदित्य ठाकरे यांनाही शुभेच्छा देत ते म्हणाले की, त्यांनी नवीन नेतृत्व पुढे आलं आहे. आमच्या शुभेच्छा, असे ते म्हणाले.