नागपूर केंद्राने इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर बंदी लागू केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना (Amit Shah)  पत्र लिहीलंय. इथेनॉल निर्मितीत 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक साखर कारखान्यांनी (Sugar Factory)  केली आहे, इथेनॉल निर्मिती बंदी लागू केली तर कारखान्यांचं एवढं प्रचंड नुकसान होणार आहे याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलंय.सरकारने घेतलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी ऊसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय.


अजित पवार म्हणाले, ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे हा उद्योगच अडचणीत येतो आहे. सरकारने घेतलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी उसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा. केंद्र सरकारने बी हेवी इथेनॉलच्या किंमती ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्याच्या इथेनॉलला द्याव्यात. सी दर्जाच्या इथेनॉलची किंमत बी हेवीच्या दर्जाची करावी यातून आर्थिक संतुलन साधता येईल.


अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता


इथेनॉल प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यांतील अनेक कारखानदार ऊसापासून इथेनॉल बनवत असल्यामुळे साखर कारखानदार अडचणीत येण्याची शक्यता असल्याची अजित पवार यांनी गडकरींना माहिती दिली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उद्रेक आहे हा मुद्दा देखील केंद्रीय नेत्यांच्या बैठकीत मांडला जाणार


सरकारचा निर्णय काय?


सध्या देशात साखरेच्या दरात (Sugar Price) मोठी वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. दरम्यान, भारत सरकार साखरेपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदी घालू शकते अशा बातम्या येताच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भाव सुमारे 8 टक्क्यांनी घसरले आहेत. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. साखरेचे भाव खाली येण्याची शक्यता आहे.