मुंबई : महायुतीत आता परस्परांवर कुरघोडी सुरू झाली की काय असं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री बाबासाहेब पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्यातील दोन निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती देण्यात आल्याने अजित पवारांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा अशी अजित पवारांकडून आमदारांसमोर इच्छा व्यक्त करण्यात आली. 


हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा पदभार तर बाबासाहेब पाटील यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादीच्या या दोन्ही मंत्र्यांच्या खात्याच्या दोन निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परस्पर स्थगिती दिली असल्याची माहिती आहे. त्यावरूनच अजित पवारांनी ही नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. 


राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या निर्णयाला परस्पर स्थगिती


प्रत्येक आठवड्यात आमदार आणि मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा अजित पवारांकडून घेतला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामासंदर्भात पहिलीच आढावा बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या खात्याच्या संर्दभात काही निर्णय घेतले होते. पण त्यांचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी कल्पना न देताच परस्पर स्थगित केल्याची माहिती आहे. 


महायुतीमध्ये समन्वय साधला पाहिजे


महायुती म्हणून सामोरं जात असताना कुठेतरी समन्वय असावा अशी इच्छा यावेळी अजित पवारांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. भविष्यात महायुती म्हणून वाटचाल करायची असेल तर पक्षाचे प्रमुख म्हणून कुठेतरी समन्वय साधला गेला पाहिजे. चर्चा करूनच असे निर्णय घेतले पाहिजेत अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. 


धनंजय मुंडेंनी घेतली अजितदादांची भेट


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला मोक्का लागल्यानंतर परळीमध्ये त्याच्या समर्थकांनी बंद पुकारला होता. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अवघ्या 10 मिनिटांत धनंजय मुंडे अजितदादांना भेटून परळीला रवाना झाले. कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पाहता मुंडे परळीकडे निघालेत अशी माहिती आहे. सध्याची परस्थिती शांत झाल्यावर पुढील दोन दिवसात माध्यमांशी चर्चा करु, अशी माहिती धनंजय मुंडेंनी एबीपी माझाला दिली. 


ही बातमी वाचा: