Jayan Patil ED Enquiry : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीनं सोमवारी तब्बल 9 तास चौकशी केली. IL&FS घोटाळ्याप्रकरणी ईडीनं जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला. महत्त्वाचं म्हणजे, ईडीनं काही कागदपत्रं देखील मागवली होती, मात्र जयंत पाटलांनी ती सोबत नेली नव्हती. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जयंत पाटलांची चौकशी झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी फोन केले. ईडी चौकशी झाल्यानंतर त्यांची विचारपूस केली. मात्र, राष्ट्रवादीच्या वरच्या फळीत समाविष्ठ होणारे अजित पवारांचा मात्र फोन करणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश नव्हता. याबाबत खुद्द जयंत पाटलांनी माहिती दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 9 तास जयंत पाटलांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अनेक नेत्यांनी फोन करुन जयंत पाटलांची विचारपूस केली. तसेच, त्यांच्या चौकशीविरोधाचं समर्थनही केलं. मात्र यामध्ये राष्ट्रवादीच्या वरच्या फळीतील नेते अजित पवारांचा मात्र जयंत पाटलांना फोनच आला नाही. 


जयंत पाटील आज शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. सकाळी ते ज्यावेळी सिल्वर ओककडे रवाना झाले, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना कोणकोणत्या नेत्यांचे फोन आले, अशी विचारणा झाली. त्यावेळी त्यांनी सगळ्याच नेत्यांचे फोन आल्याचं सांगितलं. मात्र, त्यानंतर अजित पवारांचं नाव घेतल्यानंतर त्यांचा फोन नाही आला, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आणि ते तिथून निघून गेले. राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, राष्ट्रवादीतही दोन गट झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ईडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले होते. सिल्व्हर ओकवर घेतली पवारांची भेट घेतली आणि त्यांना ईडी चौकशीबाबत दिली माहिती. 


जयंत पाटील एकटे पडलेत? 


जयंत पाटील जेव्हा ईडी कार्यालयात होते, तेव्हा शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यापैकी कुणीही सोमवारी प्रदेश कार्यालयात दिसलं नाही. केवळ जितेंद्र आव्हाड दिवसभर तिथं हजर होते. यामुळेच, ईडी चौकशीदरम्यान जयंत पाटील पक्षात एकाकी पडलेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटलांनी अर्थातच हे नाकारलं आहे. 


जयंत पाटलांच्या ईडी चौकशीबाबत शरद पवार काय म्हणाले? 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची मुंबईत ईडी चौकशी सुरू असताना दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत भाजपवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 नेत्यांची आतापर्यंत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कसा सुरू आहे, हे राज्यातील जनतेने पाहिले असल्याचे पवार यांनी म्हटले. 


ईडी चौकशीनंतर जयंत पाटील काय म्हणाले? 


ईडीकडून चौकशी झाली. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर दिली आहे. त्यांचं समाधान होईल अशी उत्तर दिली आहेत. माझा संबधित कंपनीशी काहीही संबंध नाही, माझा आयएलएफ कंपनीशी कोणताही संबधः नाही. माझ्यावर आरोप करण्यात आला होता की काही सब कोंत्रॅक्ट देणाऱ्या कंपनीनं पैसै दिले होते हे आरोप साफ चुकीचे आहेत.