नांदेड : 15 वर्षे राज्यात सत्तेत एकत्र नांदणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आता एकमेकांवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नांदेडमध्ये जाऊन जोरदार टीका केली.
"अशोक चव्हाण हे स्वतः भ्रष्टाचारी आहेत, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं", अशा जहाल शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्येच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.
"आम्ही खोलात शिरलो तर तुम्हाला कठीण जाईल." असा इशाराही अजित पवार यांनी जाहीर सभेत दिला.
नगरापालिका निवडणुकांमध्ये वेगळी चूल मांडल्याने 15 वर्षातले सत्तेतले भागीदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.
राज्यातील विद्यमान सरकारविरोधात टीका करण्याऐवजी विरोधीपक्षातील नेते नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवरच आगपाखड करु लागले आहेत. मात्र, अजित पवार यांच्या टीकेवर अद्याप अशोक चव्हाण यांचं उत्तर आलेलं नाही. त्यामुळे अशोक चव्हाण नेमकं काय बोलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.