बारामती : कर्जमाफीसंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रीय बँकांवर आरोप केले आहेत. स्वतःची खळगी भरण्यासाठी राष्ट्रीय बँकांनी कर्जमाफीचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप अजित पवारांनी केला.


बारामतीमधल्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. सरकारने कर्जमाफीसाठी पाठवलेले साडे चार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्याऐवजी सहकार आयुक्तांनी ते पैसे आयसीआयसीआय बँकेत ठेवल्याचा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला.

हिवाळी अधिवेशनापर्यंत कर्जमाफीचे पैसे मिळणार नसल्याची शक्यताही अजित पवारांनी बोलून दाखवली.

बँकांच्या यादीत एकाच खात्याचे किंवा आधार क्रमांकाचे शेकडो लाभार्थी आहेत. थकीत कर्जदार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले अर्ज आणि आणि बँकांच्या यादीत तफावत असल्याने कर्जमाफीला विलंब होत असल्याचं समोर आलं आहे. कर्जमाफी उपसमितीच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला.

आतापर्यंतची स्थिती काय?

  • कर्जमाफीसाठी 56.59 लाख शेतकऱ्यांचे अर्ज

  • बँकांकडून 26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती सरकारला देण्यात आली

  • 4 लाख खात्यांच्या माहितीत विसंगती आढळून आली

  • 2 ते 2.5 लाख खात्यांच्या नावे अनेक लाभार्थी आणि आधार कार्ड नंबर आढळून आले.


कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी 18 ऑक्टोबरचा मुहूर्त शोधण्यात आला होता. राज्य सरकारकडून प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. तर उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे लगेच खात्यात जमा होतील, असं सांगण्यात आलं होतं.

पाहा व्हिडिओ :