बारामती : ज्यांना खायला नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ असे म्हणणारे आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले पाहिजे असे म्हणत आहेत. मतांवर डोळा ठेवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न हे शिवसेनावाले करत असल्याचा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करणारे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रीकरणाची भाषा करत आहेत. मात्र तेच लोक मुंबईत राहून कधीच शिवजयंतीला किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाला जात नाहीत असा टोला अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
पूनम महाजन, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं?, अजित पवारांचा सवाल
पूनम महाजन तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं? हे महाभारत कसं घडलं? कशामुळे घडलं हे विचारलं तर. तुम्हाला बोलता येतं तसं आम्हाला ही बोलता येतं, असा घणाघात अजित पवार यांनी केला.
आपलं वय काय, आपली राजकीय कारकीर्द किती, पवारसाहेब आणि प्रमोद महाजनांचे संबंध कसे होते आणि या पवार साहेबांना शकुनी मामाची उपमा द्यायला निघाल्या. तुमची औकात काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, हे लक्षात घ्यावं असं सांगताना जर आम्ही म्हटलं की तुझ्या बापाला चुलत्याने का मारलं? काय उत्तर आहे, असा सवाल अजित पवारांनी केला.
आपली राजकीय कारकीर्द किती? आपण बोलतो किती? याचं भान न ठेवता पूनम महाजन यांनी आमच्या दैवतावर टीका केली. महाजन कुटुंबात भलं मोठं महाभारत का घडलं. याचं उत्तर त्यांना देता येईल का? असा सवाल अजित पवार यांनी केला. आम्ही पातळी सोडत नाही याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु असं समजू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बारामती तालुक्यातील कुरणेवाडी या गावी विविध विकास कामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते.