महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि पुतणे ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. काका आणि पुतणे यांचं सख्य आणि वाद याला राजकीय किनार नेहमीच राहिली आहे. राज्याच्या राजकारणात अजून एक काका आणि पुतण्याची जोडी चर्चेत येत आहे ती म्हणजे अजित पवार आणि रोहित पवार.


राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, अजित पवार, धनंजय मुंडे राज्यात फिरत आहे. सरकार वर टीका करत आहेत. ही यात्रा सोमवारी कर्जत जामखेड मतदारसंघात आली. रोहित पवार कर्जत जामखेडमधून विधानसभेसाठी तयारी करत आहेत. पण जेव्हा यात्रा या मतदारसंघात आली तेव्हा इतके दिवस यात्रेत असलेले अजित पवार मात्र इथे अनुपस्थित होते.


मतदारसंघात जामखेड येथी बाजारतळ मैदानावर भव्य सभा झाली. सभेत डॉ. अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाषणं झाली. पण अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे कुजबुज सुरू झाली. कर्जत जामखेड या जागेसाठी राष्ट्रवादी मधून मंजुषा गुंड या पण इच्छूक आहेत. अशी चर्चा आहे की अजित पवार यांचे समर्थक असलेले राजेश गुंड यांची पत्नी मंजुषा आहेत. तिकीट रोहित पवार यांना मिळणार असलं तरी अजित पवार समर्थक तिथून इच्छूक असल्याची चर्चा मतदरसंघात होती. त्यात शिवस्वराज्य यात्रा कर्जत जामखेड इथे आली असताना अजित पवार यांनी तिथे जाणं टाळलं हा चर्चेचा विषय झाला. विशेष म्हणजे नुसते अजित पवार नाही तर त्यांचे विश्वासू धनंजय मुंडे यांनी देखील या मतदारसंघातील यात्रेला दांडी मारली.


खरं तर लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारला उमेदवारी दिली तेव्हाच पार्थ आणि रोहित या भावांमधील स्पर्धेच्या चर्चेला सुरुवात झाली. शरद पवार यांनी पार्थ मुळे निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय, त्यावर रोहित पवार यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट, रोहित पवार यांनी अशी पोस्ट लिहायला नव्हती पाहिजे हे पार्थचे मत यामुळे या दोन्ही भावांची चर्चा प्रसारमाध्यमात झाली. पण विधानसभेला इच्छूक असलेल्या रोहित पवारांबाबत काका अजित पवार विशेष उत्सुक दिसत नाही का? रोहित पवार हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याबरोबरीने नेहमी दिसतात पण राज्यात अजित पवारांचा पक्षावर वर्चस्व असताना रोहित पवार हे काका अजित पवारांबरोबर का दिसत नाही? अशी कुजबुज आता सुरू झाली आहे.


बाळासाहेब ठाकरे- राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे- धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर- संदीप क्षीरसागर यानंतर राज्यात अजित पवार आणि रोहित पवार ही काका पुतण्याची जोडी आता चर्चेत आली आहे. राज्यातील राजकारणाचा इतिहास सांगतो की महत्वकांक्षी पुतणे हे काकांना डोकेदुखी ठरले आहेत. त्यामुळे अशा पुतण्यांना काकांविरोधात बंड करण्याची वेळ आली होती. अजित पवार आणि रोहित पवार ही काका पुतण्याची जोडी भविष्यात राजकारणाचा इतिहास बदलणार की त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे काळच ठरवेल.