मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान यां दिग्गज कलाकारांसह जगातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. मात्र गणेशोत्सवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीबरोबच चर्चा झाली ती अजित पवरांच्या अनुपस्थितीची. अजित पवारांनी (Ajit Pawar) वर्षा निवासस्थानावरील गणेशोत्सवात पाठ फिरवल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजा रंगली आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी टाळले
अजित पवारांनी गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील लालबाग, सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली. एवढच नाही तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी देखील हजेरी लावली. मात्र मुंबईत असून देखील अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी टाळले. यावर दीपक केसरकर विचारले असता ते म्हणाले,एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे संबंध चांगले आहेत. कदाचित चुकून मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीला जाणार राहून गेले असेल. अशा चर्चा म्हणजे खाजून खरूज काढणं अशातला हा प्रकार आहे.
अजित पवारांमुळे शिंदे गटातील अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्डवॉर असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून रंगल्या आहेत. आता अजित पवारांनी मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदर देखील मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते त्यावेळी देखील पाठ फिरवली होती. दरम्यान अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे बोलले जाते. अजित पवारांमुळे शिंदे गटातील अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांच्या शासकीय निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय नेते मुंबईत आल्यावरच दर्शन घेतलं. मात्र त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असू द्या किंवा मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईतला दौरा असू द्यात या ठिकाणी कुठेही दिसले नाही. इतकंच काय तर अजित पवार गटातील एक-दोन मंत्री आणि नेते सोडले तर बाकीच्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी दिसले नाहीत.
सण उत्सवात कुटुंब -समाज एकत्र येत हे सण उत्सव साजरे करतो. आता त्यात यंदाच्या गणेशोत्सवात सत्तेत एकत्र असणारे. वेळोवेळी आपण एक आहोत हे दाखवणारे हे नेते मात्र आपल्या व्यस्त वेळामुळे फारसे एकत्र दिसले नाहीत आणि त्यामुळेच या सगळ्याची राजकीय चर्चा तर होणारच. आता गणेशोत्सवात संपूर्ण मुंबईचा दौरा करणारे अजित पवारांना केसरकर म्हणात त्याप्रमाणे खरेच लक्षात राहिले नसेल.