यवतमाळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar ABP Majha)  एबीपी माझाला EXCLUSIVE मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठी विधानं केली. उद्धव ठाकरेंचं सरकार धोक्यात आलं तेव्हा आम्ही अमित शाहांशी चर्चा करत होतो, असं वक्तव्य अजित पवारांनी पुन्हा एकदा केलं आहे. आम्ही त्याबद्दल शरद पवारांना पत्र देखील दिलं होतं, त्यावर रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे यांच्या देखील सह्या होत्या असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी थेट उत्तर दिलं. तसंच, शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नांवर उत्तर देताना काही परखड तर काही सूचक वक्तव्य केली आहेत. अमरावतीतल्या प्रचार दौऱ्यादरम्यान अजित पवारांशी बातचित केली.  


अजित पवार म्हणाले,  उद्धव ठाकरेंचे सरकार जात होतं तेव्हा शरद पवारांना पत्र दिलं होते.  जयंत पाटील, जितेद्र आव्हाड, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे या सर्वांनी सह्या केल्या होत्य.   राजेश टोपेच पत्र घेऊन गेले होते. साहेबांनी मला सांगितलं अमित भाईंशी चर्चा करा. नंतर परत निरोप आला की,  अशी चर्चा फोनवर होत नाही.  कारण तुमचा मागचा अनुभव चांगला नाही.  मागे पाठिंबा न मागताही तुम्ही पाठिंबा दिला होता, मग ती चर्चा रद्द झाली.


 शिवसेनेला बाहेर काढण्याच्या प्रस्तावाचा मी आणि प्रफुल्ल पटेल साक्षीदार :अजित पवार 


पवारांनी असं का केलं ? याचं कारण तुम्ही सांगू शकता का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले,  याबद्दल आपल्याला माहिती नाही.  2014 मध्ये राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल येण्यापूर्वीच भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. काही दिवसांनी सरकारमध्ये जायचं असल्याचं सांगितलं गेलं, परंतु, कुठं काय खटकलं माहिती नाही. 2014 साली   शिवसेनेला बाहेर काढायचं आणि आम्हाला आत घ्यायचं असा प्रस्ताव आमच्या वरिष्ठांनी दिला होता. पण भाजपनं नकार दिला होता कारण एवढ्या वर्षाची आमची मैत्री आहे कोणत्या कारणावरून बाहेर काढायचं ज्यांना सत्तेतून बाहेर काढायचं होतं त्यांच्या सोबत 2019 ला सत्तेत गेले याचा साक्षीदार मी आहे प्रफुल्ल पटेल आहे. 


 7  मे पर्यंत भावनिक  होणार नाही, ही लढाई भावकिची नाही : अजित पवार 


बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले,  निवडणुकीत या भावनिक नातं चालत नाही.  7  मे पर्यंत भावनिक, मऊ व्हायचं नाही असं ठरवलं आहे. बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करता आला तर तो अधिक जलद गतीनं करता येतात.   मला निवडणुका नव्या नाहीत समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे अशीच रणनीती आणतो आणि काम करतो.  बारामतीची जागा लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत. ही  लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही.  देशासाठी ही लढाई लढायची आहे. मोदी आणि राहुल गांधी दोघांमध्ये लढाई सुरु आहे.  केंद्रात जाणारा खासदार हा सत्ताधारी विचारांचा गेला तर कामं जास्त करता येतात मतदारसंघातला विकास वेगानं होतं.  


जोपर्यंत माझ्यासोबत जनता तोपर्यंत माझ्या कारकीर्दीला धोका नाही: अजित पवार 


पार्थ पवारांनंतर सुनेत्रा पवार हरल्या तर? तुमचं करियर धोक्यात येईल? या विषयी बोलताना  अजित पवार म्हणाल्या,  माझ्यासोबत जनता सोबत आहे तोपर्यंत माझ्या कारकीर्दीला कोणताही धोका नाही. बारामतीसाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करत असताना अनेक नावं पुढे आली.  सुनेत्रा पवारांना चांगला अनुभव आहे त्यांनी अनेक समाजकार्य केले आहे गावक-यांसोबत चांगलं ट्युनिंग चांगला आहे.