Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात (Air India Plane Crash Gujarat) 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील 16 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती, इरफान शेख या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे.
पवईतील पायलट सुमित सभ्रवाल-
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पायलट सुमित सभ्रवाल हे पवईच्या जलवायू विहार इमारतीमध्ये त्यांच्या वडिलांसह राहतात. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच येथील स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले.
बदलापूरचे दिपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू-
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवाशी आणि एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती बदलापुरात त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या मित्र परिवाराला कळताच पाठक यांच्या घरी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे आज दुपारी विमानात जाण्यापूर्वीच त्याचं आईशी फोनवरून बोलणं झालं होतं. त्यानंतर दीपकशी काही संवाद झालेला नाही. मात्र, आता दीपकचा फोन लागतो, पण तो उचलत नाही, अशी मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया त्यांच्या बहिणीने दिली. दीपकचे 4 वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.
पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या मैथिलीनं जीव गमावला-
अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचा समावेश आहे. क्रू मेंबर्समध्ये हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश आहे. मैथालीच्या पश्चात आई - वडील , बहिण आणि भाऊ असा परिवार आहे. मैथिलीनं हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले होते. दोन वर्षांपूर्वी तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात नोकरी सुरु केली होती.
डोंबिवलीतील क्रू रोशनी सोनघरे हिचाही अपघातात मृत्यू-
डोंबिवलीतील एअर इंडिया केबिन क्रू रोशनी सोनघरे हिचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी एअर इंडिया मध्ये सहभागी झाली. अवघ्या चार दिवसांपूर्वी ती गावी आली होती. कुलदेवतेचं दर्शन घेतलं, नातेवाईकांना भेटली. नंतर अहमदाबाद येथे गेली होती. केवळ एक आठवड्यापूर्वी तिच्याशी लग्नाबाबत चर्चा झाली होती, आणि तिला तिच्या पसंतीनं लग्न कर असं घरच्यांची सांगितलं होतं. सध्या रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला पोहोचले आहेत. रोशनीच्या आईला लो बीपीचा त्रास असल्यामुळे अद्याप या दु:खद घटनेची पूर्ण माहिती त्यांना देण्यात आलेली नाही. संपूर्ण डोंबिवली शहरात शोकमय वातावरण आहे. या भीषण अपघातानंतर अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, रोशनीचा संघर्ष आणि यशाचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये श्रद्धा धवनचाही मृत्यू-
अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये श्रद्धा धवन हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे.श्रद्धा ही एअर इंडिया मध्ये सीनियर ग्रुप मेंबर होती. चा पती राजेश हा देखील एअर इंडिया मध्येच कामाला आहे. कल्पना याच्यापेक्षा तिचा पती मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धाने आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं.परंतु तिचा तो संवाद अखेरचा ठरला. तिच्या मृत्यूची बातमी कळताच श्रद्धा हिच्या मुलुंडमधील निवासस्थाने रहिवाशांनी शोक व्यक्त केला जात आहे.
विमान अपघातात पिंपरीतील इरफान शेखचा मृत्यू-
गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्यू मेंबरचा ही दुरदैवी अंत झाला. इरफान हा पिंपरी चिंचवड च्या संत तुकाराम नगर मध्ये राहायला होता. आजी आजोबा आई वडील भाऊ अस कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडिया मध्ये कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी ही येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे.त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत.
अपर्ण महाडिक सुनिल तटकरेंच्या नातवाईक-
अहमदाबादमधील विमान अपघातात क्रू असणाऱ्या अपर्णा महाडिक यांचाही मृ्त्यू झाला आहे. अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या, अमोल देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत. सुनील तटकरे गोरेगावमध्ये अमोल महाडिक यांच्या घरी दाखल झाले आहेत.
सांगोल्यातील दोघांचा मृत्यू-
विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले महादेव तुकाराम पवार (वय वर्ष 67) आणि त्यांच्या पत्नी अशा महादेव पवार (वय 55) हे दोघे पती पत्नी सांगोला तालुक्यातील हातीद गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करत असल्याने ते सध्या अहमदाबाद येथे स्थायिक झाले आहेत. येथील कापड मिल नडीयाद येथे ते काम करत होते, सध्या निवृत्त झाले होते. आपल्या लंडनच्या मुलाला भेटण्यासाठी हे दोघे लंडनला चालले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. विशेष म्हणजे,मागच्या पंधरा दिवसांमध्ये हे दोघे हातीद या त्यांच्या मूळ गावी भावांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ एक मुलगी दोन मुले आहेत.