अहमदनगर : कळसुबाईला ट्रेकिंगसाठी निघालेल्या तीन जणांच्या वाहनाला अपघात झाला आणि गाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. या अपघाताला निमित्त ठरलंय गुगल मॅप. अकोले तालुक्यातील कोतुळ गावाजवळील पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून यात वाहनचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जण मात्र बचावले आहे.


मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले समीर राजूरकर आणि शेखर गुरू आपल्या इंडेव्हर कारमधून कळसुबाई येथे ट्रेकिंगसाठी निघाले होते. शनिवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास रस्ता चुकू नये म्हणून त्यांनी गूगल मॅपचा वापर केला. गूगल मॅपचा वापर करत कोतुळ मार्गे अकोलेकडे जात असताना अचानक रस्त्यात पाण्याचा प्रवाह दिसल्याने गाडी चालक सतीश घुले गोंधळले व गाडी थेट पिंपळगाव खांड धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. यात वाहनचालक सतीश घुले याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर दोघे मात्र बचावले आहेत.


चार वर्षांपूर्वी पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती झाल्यावर कोतुळ गावाजवळील मुळा नदीवरील हा पूल पाण्याखाली जात असून धरणाच्या बॅक वॉटरचे पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद असते. मात्र गुगल मॅपवर आजही हा रस्ता दिसत असल्याने व रात्रीची वेळ असल्याने या तिघांनाअंदाज आला नाही. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अद्यापही प्रलंबित असून गुगल मॅपवर मात्र याबाबत कोणतीही माहिती नसल्याने एकाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.