पंढरपूर : दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडली मात्र विठ्ठल मंदिराने दर्शनासाठी ऑनलाईन पद्धत सुरु केली होती. त्यामुळे राज्यातून आणि राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांना नामदेव पायरीचे दर्शन घेऊनच परत फिरावे लागत होते. एकाबाजूला ऑनलाईन व्यवस्थेची माहितीच भाविकांपर्यंत न पोहोचल्याने शेकडो किलोमीटर लांबून आलेल्या भाविकांना देवाचे दर्शन न घेताच निराश मनाने परत फिरावे लागत होते. याचे वास्तव ABP माझाने मांडत भाविकांची तीव्र नाराजी समोर आणल्यानंतर आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत, 20 जानेवारीपासून विठ्ठल दर्शनाला ऑनलाईन पास नसणाऱ्यांनाही सोडण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.


मंदिर समितीच्या निर्णयाचे भाविकांनी जोरदार स्वागत करत आता किमान ऑनलाईन पास नाही या कारणाने परत फिरावे लागणार नाही. आजच्या बैठकीत रोजच्या भाविकांच्या संख्येतही 8 हजारापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रोज 8 हजार भाविकांची देवाशी थेट भेट शक्य होणार आहे. यासाठी भाविकांना आपल्या सोबत आपल्या वयाचे पुरावे ठेवावे लागणार असून 65 वर्षाच्या आतील व 10 वर्षाच्या पुढील भाविकांसी यामुळे दर्शन मिळणे शक्य होणार आहे.


विठुरायाच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करताना वृद्ध भाविक आणि महिलांनीही पास दिले जात आहेत. पास हातात असल्याने शेकडो किलोमीटरवरून हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचत होते. मात्र येथे आल्यावर मात्र त्यांना नियम दाखवून दर्शनाला सोडले जात नव्हते. मंदिर समितीच्या ऑनलाईन बुकिंगमधील या तांत्रिक दोषामुळे भाविकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं होतं.


वास्तविक कोरोनाच्या नियमानुसार 65 वर्षांपुढील भाविक, गरोदर महिला आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना दर्शनाला न सोडण्याचा नियम आहे. मात्र मंदिराच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये अशा भाविकांचे पासच का दिले जातात असा सवाल भाविकांनी केला होता.