अहमदनगर : अहमदनगरमध्ये निवडणुकीची दारु गावकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. अतिमद्यसेवनामुळे तिघांचा बळी गेला आहे, तर तिघं जण अत्यवस्थ आहेत. नगरमधील जेऊर गटातील पांगरमल गावात पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर हा प्रकार घडला आहे.


राजेंद्र आंधळे, पोपट आव्हाड, दिलीप आव्हाड यांचा मृत्यू झाला आहे, तर आदिनाथ आव्हाड, राजेंद्र आव्हाड आणि रावसाहेब आव्हाड अत्यवस्थ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवसेना उमेदवारानं दिलेल्या पार्टीमध्ये दारु प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

रविवारी रात्री मतदारांना पार्टी देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांना त्रास होऊ लागला. जेऊर गटातील शिवसेनेच्या उमेदवारानं मतदारांना पार्टी दिल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. मात्र पार्टीत बनावट दारुच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी राजकीय कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे.