- सुनिल भोंगळ
Ahmednagar Nagar Panchayat Elections 2022 : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतचा यात समावेश होता. यापैकी कर्जत नगरपंचायत निवडणूकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. कारण कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
रोहित पवार यांनी कर्जत विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते राम शिंदे यांचा पराभव करत भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रवेश केला होता. त्यानंतर होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, पूर्वाश्रमीचे भाजपचे कट्टर समर्थक नामदेव राऊत यांना आपल्या गोटात शामिल करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला जोरदार धक्का दिला. त्यानंतर नामदेव राऊत यांच्या समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचं पारडं जड झालं होतं.
दरम्यानच्या काळात भाजपच्या उमेदवारांना दवाब टाकल्याचा आरोप करत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रचार काळातच गोदडबाबा मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
राष्ट्रवादीला एक हाती सत्ता
राष्ट्रवादी - 12
काँग्रेस - 3
भाजप- 2
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीला 12 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या, यापैकी राष्ट्रवादीची 1 जागा आधीच बिनविरोध झाली होती. तर भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मिळवावं लागलं. त्यामुळे अगदी कर्जत ग्रामपंचायत असल्यापासून ते नगरपंचायत होइपर्यंत भाजपची सत्ता असलेल्या कर्जतमध्ये राष्ट्रवादीने भाजपची दाणादाण उडवत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. तर पारनेर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र सत्तेत आहेत. मात्र , पारनेर नगरपंचायतमध्ये शिवसेना राष्ट्रवादी लढत पाहायला मिळाली.
पारनेर नगरपंचायतमध्ये कुणाला स्पष्ट बहुमत नाही
राष्ट्रवादी-7
शिवसेना-6
शहर विकास आघाडी-2
भाजप-1
अपक्ष -1
पारनेर नगरपंचायत निवडणूकीत आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला 7 जागा मिळल्या आणि विजय औटी यांना 6 जागा मिळवता आल्या. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं तर अपक्ष 1 अशा निकाल लागला. दरम्यान यात लक्षवेधी निकाल ठरला तो विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांचा.पारनेर नगरपंचायत निवडणुकीत जयश्री औटी यांचा राष्ट्रवादीचे हेमांगी नगरे यांनी पराभव केला. दरम्यान पारनेर नगरपंचायतमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी राष्ट्रवादी नेमकी कुणाची साथ घेऊन सत्ता स्थापन करते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान पारनेर नगरपंचायतवर नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल असं आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.