अहमदनगर : राज्य शासनाच्या निकषानुसार अहमदनगर जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश होत असून सोमवारपासून जिल्हा पूर्णपणे अनलॉक होणार असल्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4.30% इतका आहे. राज्याच्या निकषानुसार हा रेट 5% पेक्षा कमी असल्याने अहमदनगर जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असून सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक होणार आहे.


शिवस्वराज्य दिनानिमित्त सरकारी कार्यालयांवर भगवा झेंडा फडकवण्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याला विरोध केला. मात्र, सदावर्ते यांना नेमकी अडचण काय आहे? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केलाय. मराठा आरक्षणाच्या वेळी देखील त्यांनी असाच विरोध केला होता. त्यामुळे त्यांचे भारतीय जनता पक्षासोबत कनेक्शन आहे की काय असा वास येत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी विनायक मेटे यांनी भव्य मोर्चा काढला. मात्र, आरक्षण देण्याबाबत राज्याला अधिकार राहिलेला नसून सुप्रीम कोर्टाचा निकाल स्पष्ट असल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मराठा आरक्षणबाबत राजकारण न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे, असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर केंद्र सरकार मागासवर्गीय आयोग मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, त्यासाठी आपण एकत्रित त्यांना भेटू असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. विनायक मेटे हे भारतीय जनता पार्टीचे असल्याने त्यांच्या भावना रस्ता आहे, अशी कोपरखळी देखील मुश्रीफ यांनी लगावली आहे.


अनलॉक कसं राहणा?


अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 15 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.


पहिल्या स्तरात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसऱ्या स्तरात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्तरातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा सुरु राहिल.