अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण, भोंदू बाबावर पोक्सो अंतर्गत गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2018 09:27 AM (IST)
अकोले तालुक्यातील एका भोंदू बाबावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर: अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अकोले तालुक्यातील एका भोंदू बाबावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिल तळपे असं आरोपीचं नाव आहे. अनिल तळपे प्रवचन-कीर्तन करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. भोंदू बाबा पीडित मुलाला ऑफिस दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. त्यावेळ गजबजलेल्या बस स्थानकाजवळील कॉम्प्लेक्समध्ये कोणीही नसल्याचं पाहून, त्याने लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलाने प्रसंगावधान दाखवत तिथून पळ काढला आणि घडला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी तातडीने अकोले पोलिसात धाव घेत, गुन्हा दाखल केला. दरम्यान अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीनुसार, अकोले पोलीस ठाण्यात आरोपी अनिल तळपविरोधात लहान मुलांचे अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 7 /8 [ पोक्सो ] नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.