नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2016 11:26 AM (IST)
अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी कर्जत परिसरातले नागरिक आक्रमक झाले आहेत. कारवाई करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत आज कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर कर्जतमधला रास्ता रोको 5 तासांनी मागे घेण्यात आला. बलात्कार आणि हत्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष भवार असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी लोकांनी केलीय.