अहमदनगर : अहमदनगरच्या कर्जत (Ahemadnagar) येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी सिनथडी जत्रेत चुलीवर धापाटे बनविण्याचा आनंद लुटला, सोबतच त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर जोरदार बॅटिंगही केली. कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधत सिनथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सिनथडी यात्रेत तालुक्यातील महिला बचत गटांसह इतरही व्यावसायिकांसाठी 100 स्टॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सिनथडी जत्रेत लहानग्यांना उंट व घोडा सफारी तर युवकांसाठी क्रिकेटचे सामान्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. तर शिवजयंती निमित्त सिनथडी यात्रेच्या प्रांगणात सामुदायिक विवाहसोहळा देखील पार पडणार आहे. तर 10 गरजू जोडप्यांना आर्थिक मदत देखील केली जाणार आहे.कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी होत आहे. 


आमदार रोहित पवारांनी बनविले चुलीवर धापाटे
कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सिनथडी जत्रेला भेट दिली, प्रत्येक स्टॉलवर जात त्यांनी स्टॉल चालकांशी संवाद साधला. दरम्यान, एका डोसाच्या स्टॉलवर गेल्यावर त्यांना डोसा बनविण्याचा मोह आवरला नाही त्यांनी थेट स्टॉलच्या किचनचा ताबा घेत डोसा बनवला आणि स्टॉलवरील ग्राहकांना वाटप देखील केला.


पुढे एक आजी चुलीवर धापाटे बनवताना पाहिल्यावर रोहित पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधत चुलीवर धापाटेही बनविले आणि आपल्या कार्यकर्त्यांनी चव चाखायला सांगितले. स्टॉलवर आजीचे नातूही होते. त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासाची चौकशी केली आणि आजीच्या तीनही नातवांना शिक्षणासाठी दत्तक घेतले.सिनथडी यात्रेत सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यात सहभागी होत त्यांनी जोरदार बॅटिंग देखील केली.


व्यवसायिकांसाठी उत्तम व्यासपीठ- रोहित पवार
दरम्यान, सिनथडी सारख्या उपक्रमातून तालुक्यातील महिला बचत गट आणि व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध होत असून, शिवजयंती निमित्त सकल मराठा समाज संघटनेच्या सामुदायिक विवाह सोहळा होतोय हे अतिशय कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या सिनथडी यात्रेचे आयोजक धनंजय लाढाणे यांनी या यात्रेला केवळ तालुक्यातूनच नाही तर जिल्ह्यातून नागरिकांनी उपस्थिती लावत असल्याचे सांगितले. तसेच शिवजयंती निमित्त एक रॅली काढून त्या माध्यमातून सामाजिक संदेश देणार असल्याची माहिती दिली.


सिना नदीच्या नावावरून या यात्रेला सिनथडी यात्रा असं नाव


कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या सिना नदीच्या नावावरून या जत्रेला सिनथडी यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. पुण्यात होणाऱ्या भिमथडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये सिनथडी यात्रा भरवण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने ही यात्रा भरवण्यात येते. 


इतर महत्वाच्या बातम्या