नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांवर तोफ डागली आहे. "कृषी विद्यापीठं फक्त नावाला आहेत, त्यांना संशोधन करायला नको. फक्त सातवा वेतन आयोग हवा.", असे म्हणत गडकरींनी कृषी विद्यापीठांवर निशाणा साधला. भारतीय शेती हा विषयच अत्यंत जटील आहे, असेही यावेळी गडकरी म्हणाले.
नाशिकमधील द्वारका सर्कल बायपासच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आले होते. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर जाहीर भाष्य केलं.
"पाण्याची समस्या संपूर्ण देशाची नाही, ती केवळ 11 राज्यांची आहे. पाणीबहुल राज्यातल्या अधिकाऱ्यांना इतर राज्यांच्या समस्या समजतच नाही. समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी कुणीही भांडत नाही. देशात पाण्याची नव्हे, तर नियोजनाची कमी आहे.", असेही यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
देशातील जलवाहतुकीशिवाय पर्याय नाही. देशातील 47 नद्यांवर वॉटर पोर्ट उभारणार आहोत, अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली.
प्रत्येक ब्रिज हा बंधारा म्हणूनही वापरला जाईल, अशाप्रकारे बांधला जायला हवा. मी तशी मागणीही केलीय. मात्र, अर्थ मंत्रालयाने खोडा घातला. मात्र, सरकार असंच चालतं. पण यांना सरळ कसं करायचं, हे मला माहितंय, असे गडकरी म्हणाले.
जलसंपदा विभागाचे बजेट किमान 50 हजार कोटी असावं, अशी मागणी प्रत्येक राज्याने पंतप्रधानांकडे करावी, असा सल्लाही गडकरींनी दिला.