Sadabhau Khot : केंद्र सरकारने कांदा (Onion)निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या निर्णयानंतर विविध शेतकरी संघटनांनी देखील केंद्र सरकारवर टीका केलीय. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय. सरकारनं शेतकऱ्यांना अफू, गांजा लावायची परवानगी द्यावी, आम्ही कांदा भाजीपाला, अन्नधान्य पिकवायचं बंद करतो, अशा शब्दात खोतांनी सरकारवर टीका केली. 


शेतकऱ्यांची शेती ताब्यात घ्या, त्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला मंत्रालयातील क्लर्क एवढा पगार द्या 


सरकारनं शेती करायची की नाही करायची याबाबत सरकारनं धोरण तयार करावं. सगळ्यांनाच शेतकऱ्यांचा शेतमाल फुकट खायचा असेल तर, सरकारनं शेतकऱ्यांची शेती ताब्यात घ्यावी आणि त्याच्या घरातील प्रत्येकाला मंत्रालयातील क्लर्क एवढा पगार द्यावा असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. आम्ही शेतमाल पिकवायचे बंद करतो, शेतकऱ्याला अफू गांजा लावायची परवानगी द्यावी असेही खोत म्हणाले. तुम्हाला कोणाच्या शेतात अन्नधान्य पिकवायचे ते पिकवा असे खोत म्हणाले. 


ज्यांना जास्त कांदा खायचाय त्यांनी स्वस्ताईच्या काळात कांद्याचा ज्यूस करावा


कांदा नाही खाल्ला म्हणून कोणाचा मृत्यू झालाय का? ज्याला जास्त कांदा खायचा आहे, त्यांनी स्वस्ताईच्या काळात कांद्याचा ज्यूस करा आणि कांद्यानं अंगोळ करा असेही खोत म्हणाले. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले की त्याचे खळे डोळ्यादेखत लुटलं जात आहे. त्यामुळं कांदा प्रश्नी पुढच्या महिन्यात आम्ही नाशिकपासून शेतकऱ्यांचे आंदोलन उभं करणार असल्याचे खोत म्हणाले. सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की, शेतकऱ्यांना काही देता नाही आलं देऊ नका मात्र, अन्नात माती कालवण्याचे काम करु नका असेही खोत म्हणाले. दरम्यान, कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारला रयत क्राती संघटनेच्या वतीनं निवेदन देणार असल्याचंही खोत यावेळी म्हणाले.


धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर 


सरकारनं कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मी केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं. या मुद्यावरुन राज्य सरकारवर देखील टीका होत आहे. त्यामुळं धनंजय मुंडे हे आज दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार आहेत. तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी नक्कीच आम्ही मार्ग काढू असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


कांदा निर्यात शुल्क:  कृषीमंत्री धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर, कृषीमंत्री तोमरांसह पियूष गोयलांची भेट घेणार