बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार जितके गंभीर आहेत तितकेच ते आपल्या मिश्किल स्वभावामुळं चर्चेत असतात. याचाच प्रत्यय बारामतीत आला आहे. जसंजसं आमचं वय वाढेल तसंतसं आमचा उत्साह वाढतच चालला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र तसं म्हटल्यानंतर पुढे मिश्किलपणे 'कामाचा बरका' असं त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला. ते म्हणाले की, बारामतीकर पवार साहेबांना तसेच सुप्रिया व मलाही पाठिंबा देतात. म्हणून आम्हाला असं वाटत जेवढ्या लवकर होईल तेवढं काम करावं. दिवस उजाडल्यानंतर आम्ही काम सुरू करतोय. सूर्य उगवून दिसायला लागलं की आम्ही कामाला सुरुवात करतो. नाहीतर रात्रीची पण काम केली असती.


ते म्हणाले की, जर काही चांगलं चाललं असताना आपल्याकडे म्हणतात ना बिब्बा कालवायचं काम करतात जे जित्राब लय वाईट. त्यांचा अजिबात विचार करु नका. तसाबी तुम्ही बारामतीकर विचार करत नाहीत. जर बाहेरचं कुणी पार्सल आल तर त्याच डिपॉझीट जप्त करून परत पाठवता, असा टोला त्यांनी विधानसभेला बारामतीतून विरोधात उभे राहिलेले विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना नाव न घेता लगावला.


अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांचे वय 80 झालेय, मी साठीला आलोय, सुप्रिया देखील पन्नाशीला आलीय. जसं जसं आमचं वय वाढेल तसं तसं आमचा उत्साह वाढतच चालला आहे. बारामतीत गदिमा सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत माझा व्यवसाय माझा हक्क या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी शिरुरचे आमदार अशोक पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते.