भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतक्या तैलचित्राची गाजरतुला केली आहे. यासाठी खास गुजरातवरून 104 किलो गुजराती गाजर मागविले गेले. 6 वर्षांआधी भूमिपूजन झालेल्या 'भेल' (भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड) प्रकल्पाला आज सहा वर्षे लोटूनही कामाला सुरुवात न झाल्याने गाजर वाटत दिवाळीच्या दिवशी सरकारचा निषेध करण्यात आला.

गावातील 250 शेतकऱ्यांनी 550 एकर शेती देऊनही रोजगार न मिळाल्याने मोदी आणि फडणवीस सरकारने रोजगाराच्या नावावर बेरोजगार तरुणांना गाजर दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके म्हणजे 104 किलो गाजर आणून लाखनीवासियांनी मुख्यमंत्र्याच्या तैलचित्राची गाजरतुला केली.

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 14 मे 2013 ला 'भेल'चे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ला लागून असलेल्या 250 शेतकऱ्यांची 550 एकर शेती यासाठी अधिग्रहित करण्यात आली असून प्रति एकर 9 लक्ष 50 हजार दर देण्यात आला आहे.

प्रतिकुटुंब 6 लक्ष 10 हजारांचे पॅकेज देण्यात आले असून सोबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला प्रकल्पात नोकरी देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र 6 वर्षे लोटूनही ना प्रकल्प सुरु झाला ना रोजगार मिळाला. त्यामुळे लाखनी येथे गुजरात राज्यातून 104 किलो गुजराती गाजर मागवून आज दिवाळी निमित्त मुख्यमंत्र्याच्या तैलचित्राची गाजरतुला केली आणि गावकऱ्यांना मोफत गाजर वाटप केले.