अहमदनगर: अहमदनगरला कोपर्डीतील घटनेनंतरही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचं सत्र सुरुच आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीमध्ये शाळकरी मुलीचं तोंड बांधून झाडाला बांधून विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत जाण्यास मनाई केल्यानंतरही शाळेत जात असल्यानं दोघांनी तिचा विनयभंग केला.


पीडित मुलगी आठवीत शिकत असून, सोमवारी सकाळी अकरा वाजता चुलत बहीणीबरोबर शेतातील विहिरीजवळ लघुशंकेला गेली होती.  त्यावेळी तोंड बांधून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पीडितेला झाडाला बांधून हातावर धारदार शस्त्रानं  जखमी केलं. यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन ते दोघेही फरार झाले आहेत.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.

हिंदू धर्माचा प्रभाव समाजावर कमी झाल्याने कोपर्डीसारख्या घटना: रा.स्व. संघ

हिंदू धर्माचा प्रभाव समाज मनावर कमी होत असल्यानं, कोपर्डीसारख्या देशाला खाली मान घालवणाऱ्या घटना घडत आहेत, असं मत रा.स्व.संघाचे प्रांतप्रचारक चंदन पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कर्जतमधील रा. स्व.संघाच्या समारोप शिबीरात ते बोलत होते.

''संघ कोणत्याही जात, धर्माच्या विरोधात नाही. मात्र संघाबाबत गैरसमज पसरवले जातात. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे. आम्ही हिंदुंना धर्माचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास सांगतो. देशाची संस्कृती जगात श्रेष्ठ असून ती जपण्याची गरज आहे. मात्र समाजव्यवस्थेवरील संस्कार कमी होत असल्यामुळे माता-भगिनी असुरक्षित झाल्या आहेत.''

''छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकांनद यांनी स्त्रीयांचा आदर करण्याचा आदर्श समाजासमोर घालून दिला. मात्र त्याचं विस्मरण झाल्यानं कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. हिंदू धर्म, संस्कृती कोणत्याही धर्माच्या स्त्रीचा आदर करण्यास शिकवते. मात्र याचा विसर पडल्यानं धर्म कलंकीत होत,'' असल्याचंही त्यांनी म्हटलं.