Ravindra Dhangekar : सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून जाणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये. मी घाबरणारा माणूस नाही, असे वक्तव्य काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केलं आहे. मी पुणेकर आहे घाबरणारा नाही. 4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत (Loksabha) असेन असंही धंगेकर म्हणाले. ललित पाटील प्रकरणी मी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नसल्याचे धंगेकर म्हणाले. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. 


उडता पंजाब सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उडता पंजाब सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे. लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, पब संस्कृती थांबली पाहिजे ही माझी भूमिक असल्याचे धंगेकर म्हणाले. पुण्यामध्ये देशभरातील सर्व शहरातून मुलं शिकण्यासाठी येत आहेत. इतर देशातील शहरातून येणाऱ्या मुलांच्या पालकांचे फोन येत आहेत. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाहीत हे लक्षात आल्यावर दोन पोलीस निलंबित केल्याचे धंगेकर म्हणाले. 


हसन मुश्रीफ यांची माफी मागतो, पण पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे 


रक्त फेकून देण्यापर्यंतचा गुन्हा लॅबमधील डॉक्टरांनी केला आहे. पोलिसांनी चांगला तपास केला आहे, पण अजूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असं दिसत असल्याचे धंगेकर म्हणाले. पैसे टाकून सिस्टीम विकत घेऊ शकतो, ही त्या श्रीमंतांची भूमिका होती असेही धंगेकर म्हणाले. आम्ही मंत्र्यांवर टिका केल्यानंतर माझा राग आला. मी हसन मुश्रीफ यांची माफी मागतो पण पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे असंही धंगेरकर म्हणाले. पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही. मी कुणाला घाबरत नाही, नोटीस द्या नाहीतर आणखी काही करा असेही ते म्हणाले. 


म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय 


पुण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या संरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. हसन मुश्रीफ यांच्या काळात डॉक्टर कसे वागतात हे त्यांना माहिती आहे. अनेकांना बाजूला करुन आपल्या मनाचा अधिकारी त्याठिकाणी आणला जातोय का? अशी शंका येत आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे धंगेकर म्हणाले. मला नोटीस पाठवण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी बंद करा. मी मंत्र्यांच्या मतदारसंघात, मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन माझं म्हणणं मांडणार असल्याचे धंगेकर म्हणाले. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करुन पैसे मागितले तर माझ्याकडे पैसेही नाहीत, मी जेलमध्ये जाईन. आम्हाला म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय असे धंगेकर म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


पुणे आंदोलनप्रकरणी अंधारे-धंगेकरांच्या अडचणी वाढल्या, केवळ 3 दिवसांचा अवधी; मंत्री शंभुराज देसाईं ॲक्शन मोडवर