मुंबई : कोरोनावर काम करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा एवढा अभ्यास झाला आहे की, ते अर्धे डॉक्टर झाले आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आम्हाला सर्वांना कोरोना झाला. पण यांच्या अभ्यासामुळे कोरोना या दोघांना भिऊन आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राज्यभर राबवली आहे. या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुढे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राचं हित आणि समान कार्यक्रम हा या सरकारचा धागा आहे. काही प्रश्न जरूर राहिले आहेत. महाविकासआघाडीचे सरकार हे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत. सर्व कर्मचा-यांनी कोरोनाची लढाई लढली काहींना जीव गमवावा लागला. गेल्या वर्षभरात अनेक अडचणी आल्या. तरीही लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला
महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरें, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारचे सगळे मंत्री उपस्थित होते.
बघता बघता एक वर्ष पूर्ण केलं या एका वर्षात अनेक संकंट आली पण त्यातही हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्याची कामगिरी केली. महाराष्ट्राच्या जनेतनं हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी हातभार लावला, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.