पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश देताच शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामे देतील, असं विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी केलं होतं. त्यानंतर विजय शिवतारेंनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. शिवसेनेच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे, त्यामुळेच भाजपसोबत मतभेद असल्याचंही शिवतारेंनी मान्य केलं.
कोणाशीही युती करणार नाही हे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे, त्यामुळे महायुतीची चर्चा नको, असं शिवतारेंनी स्पष्ट केलं. राज्यभरात निवडणुका होत असल्याने एकहाती सत्ता आणण्याची संधी शिवसैनिकांना असल्याचंही ते म्हणाले.
भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा काडीमोड झाल्यानं दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यानंतर आता शिवसेनेकडून थेट राज्यातलं युतीचं सरकार अस्थिर करण्याचा इशारा दिला जात आहे.
या आधी उद्धव ठाकरेंनी 'देता की जाता' हा नारा देऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली, तेव्हा ती मान्य झाली होती. काल मुख्यमंत्र्यांना भेटून अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची आणि पुढचं कर्ज व्याजमुक्त देण्याची मागणी करण्यात आली, असं शिवतारे म्हणाले. आचारसंहितेनंतर यावर निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले.
“आम्ही सर्व मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरतो आहोत. आम्हाला फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश हवा.” असे सांगत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राजीनाम्याचं पत्रच खिशातून काढून दाखवलं होतं.