Maharashtra Dial 112 : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले.


राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असून, यातील सुमारे 2.50 लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज 19 हजारावर कॉल्स स्वीकारले जातात, तर 2800 तक्रारींचा निपटारा केला जातो.




त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना 


आता यात महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टल, एसओएस, फेसबुक, ई-मेल, सिटिझन मोबाईल अ‍ॅप, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमातून येणार्‍या तक्रारींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त होणार्‍या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. यामुळे पीडितापर्यंत तातडीने मदत पोहोचू शकणार आहे. 


112 महाराष्ट्र या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हॅण्डल्स 


112 महाराष्ट्र या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हॅण्डल्स असून, अन्य तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात, तातडीची मदत पोलिसांना मागू शकतात. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत आणखी एका जलद प्रतिसाद सेवेची भर पडलेली आहे.




ही बातमी देखील वाचा