दरम्यान, नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, बरं आहे की मला दर रविवारी कणकवलीला यायला मिळेल. न्यायालयाने माझा प्रचार सोपा केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, आम्ही काही गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीत. मी जोपर्यंत आमदार आहे, तोपर्यंत आम्ही लोकांशी बांधील आहोत. लोकांनी यासाठी आम्हाला निवडून दिले आहे. लोकांवर अन्याय होत असताना मी गप्प बसू शकत नाही. उद्यापासून किंबहुना आज या दिवसापासून माझी जबाबदारी सुरू झालेली आहे. कुणीही, कुठेही माझ्या लोकांवर अन्याय करत असेल सर्वात पहिला अन्यायाच्या समोर जाणारा नितेश राणे असेल, असे ते म्हणाले.
आम्हाला शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. आंदोलन केलं ते योग्यच केलं अशी सर्व जुन्या शिवसैनिकांची भावना होती. जे आंदोलन केलं ते लोकांसाठी होतं. आता रस्ता बनवायला सुरुवात केली आहे, यामुळे आम्ही जिंकलो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला जेलमध्ये बसतानाचे फोटो पाहण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी स्वप्न पाहावं. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी स्वप्न पाहा. त्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे. 'अपना भी टाईम आयेगा' हे लक्षात ठेवा, असा टोला नितेश यांनी केसरकर यांना उद्देशून लगावला.
अधिकाऱ्यावरील चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंसह 18 समर्थकांचा जामीन मंजूर
उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्व आरोपींना जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही आणि पोलिसांना तपासात सहकार्य करु, अशी हमी देखील द्यावी लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांकडे बोट दाखवत नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडेंसह 17 समर्थकांनी अभियंत्याला चिखलाने आंघोळ घातली होती. याप्रकरणी कणकवली न्यायालयाने नितेश राणेंसह 19 जणांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी (4 जूलै) मुंबई-गोवा महामार्ग उपअभियंत्यांच्या अंगावर चिखल ओतला होता. त्यानंतर रात्री नितेश आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.