सांगली : दिल्लीच्या निर्भयाला तब्बल सात वर्षानंतर न्याय मिळाला आहे . या निकालामुळे बलात्कारांच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल, याशिवाय सर्वसामान्य जनतेचा न्याय प्रक्रियेचा विश्वास आणखी दृढ होईल असा विश्वास ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीच्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना झालेल्या शिक्षेच्या सुनावणीवर उज्ज्वल निकम सांगलीत बोलत होते. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्वागत केले आहे.तसेच अशा खटल्याची सुनावणी लवकर झाली पाहिजे तरच समाजात जरब बसेल, असेही ते म्हणाले.

निकम यांनी यावेळी बोलताना म्हणाले, निर्भया प्रकरणात पुरावे असताना व गुन्हा सिद्ध झाला असताना देखील एवढा विलंब लागतो याबद्दल जनतेच्या मनात असंतोष निर्माण होणे साहजिक असून ही अंतर्मुख करणारी गोष्ट आहे. या खटल्यात आरोपींनी वेगवेगळे हातखंडे वापरून निकाल लांबणीवर कसा पडेल याची काळजी घेतली. आता निकालानंतर आरोपींनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची वल्गना केली आहे. त्यामुळे 22 तारखे पर्यंत वाट बघावे लागणार आहे. तसेच अशा प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा आपण मागत असतो. कारण त्या गुन्हेगारांना धडा मिळावा. समाजात एका संदेश जावं आणि त्यामुळे अशा प्रकरणात जर उशिरा झाला तर त्याचा उद्देश संपुष्टात येतो.

Nirbhya case | निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी | ABP Majha



हैद्राबाद येथील पोलीस एनकाऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाल्यानंतर जनतेने आनंद साजरा केला. यावरून ही बाब स्पष्ट होते की, जनतेचा आपल्या सिस्टीम वरून विश्वास उडत चालला आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे याचा विचार न्यायव्यवस्थेने केला पाहिजे. असे गुन्हे असतील ज्यांचा समाजमनावर परिणाम होतो. ती तातडीने चालली पाहिजेत, त्यामध्ये तातडीने शिक्षा झाली पाहिजे,त्याची तातडीने अंमलबजावणी झाली पहिजे,तसेच नैसर्गिक न्याय हे फक्त आरोपीच्या बाबतीत लागू होत नाही,तर ते फिर्यादी आणि समाजालाही लागू आहे. त्यामुळे विशिष्ट गुन्ह्यात तातडीने शिक्षा अंमलबजावणी झाली पाहिजे नाहीतर हैद्राबाद सारखी घटना पुन्हा घडल्यास जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडून जाईल अशी भिती वाटते ,असे मतही सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केले आहे.