सोलापूर : डिसेंबर महिन्यात अभियोग्यता चाचणी झाली असूनही अद्याप शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण झालेल्या (पात्र)उमेदवारांनी पुण्यात आंदोलन सुरु केले. त्यानंतर अखेर आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील आठ दिवसांत पंधरा जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीची पहिली जाहिरात काढली जाईल, असे जाहीर केले.




विनोद तावडे यांनी सांगितले की, "सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांची जाहिरात काढली जाणार आहे. जाहिरातीनंतरच्या पंधरा दिवसांत सर्व भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच या भरतीदरम्यान संस्थाचालक घेत असलेल्या प्रत्येक मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील केले जाईल."

भरती प्रक्रिया का रखडली या प्रश्नावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, "संस्था चालकांमुळे भरती प्रक्रिया इतके दिवस रखडली होती. संस्था चालकांनी याचिका दाखल केल्यामुळे अनेक अडथळे निर्माण झाले होते. भरती प्रक्रियेत आम्ही केलेल्या नव्या बदलांमुळे संस्थाचालकाला शिक्षक भरतीदरम्यान एकही रुपया घेता येणार नाही.

दरम्यान विनोद तावडे म्हणाले की, आगामी निवडणुकांचा विचार करुन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान शिक्षक भरती लवकर पूर्ण व्हावी यासाठी पात्र उमेदवारांनी पुणे, नंदूरबारसह अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे.