पुणे : कोरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झालं आहे. कोरेगाव-भीमामध्ये तब्बल 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्यांच्यावर पूर्वी शांतता भंग करणे, जातीय तणाव वाढवणे अशे गुन्हे आहेत, अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं.


कोरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी झालेल्या दंगलीत करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या दंगलीचे परिणाम देशभरात उमटले होते. त्यामुळे यंदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झाल आहे. कोरेगाव-भीमामध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केल आहे.

यावर्षी सात ते दहा लाख लोक कोरेगाव भीमा येथे येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अकडा लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 1211 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहीती मिळत आहे. तसेच 1 जानेवारी रोजी दारुबंदीही करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा शांत राहील, काही अनुचित आणि अप्रिय घटना घडणार नाही, अशी 110 टक्के खात्री असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं.

अशी असणार सुरक्षा व्यवस्था

  • 12 एसआरपीएफच्या तुकड्या

  • 1 हजार 200 होमगार्ड

  • 2 हजार समता सैनिक दलाचे स्वयंसेवक

  • घातपात विरोधी पथक तैनात

  • जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट

  • 150 पीएमपीएमल आणि खासगी बसेस

  • 200 बलुन्स

  • 300 मोबाईल टॉयलेट

  • जड वाहनांची वाहतूक वळवली

  • पार्किंगसाठी 11 ठिकाणं

  • रस्त्यांवर बॅरिकेटिंग

  • 7 बीडीडीएस टीम्स

  • 40 व्हिडीओ कॅमेरे, 12 ड्रोन

  • विजयस्तंभाच्या 7-8 किमी परिसरात 306 सीसीटीव्ही