वर्धा : "सध्या शेतकरी भयान परिस्थितीला समोरं जात आहे. ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्याकडे पाहून परिस्थिती पाहा, समजा आणि मग निर्णय घ्या. आत्महत्या करुन काहीच साध्य झालं नाही, इतिहासात डोकावून पाहा," असं आवाहन प्रसिद्ध विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केलं आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील रोहणा येथे पानी फाऊंडेशनने आयोजित कार्यक्रमात भारत गणेशपुरे बोलत होते.
'सत्यमेव जयते' पानी फाऊंडेशनच्या वॉटर कपच्या दुसऱ्या सीझनमध्ये, वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याची निवड करण्यात आली आहे. गावोगावी मोठ्या हिरीरीने जलसंधारणाच्या कामात लोक सहभागी होत आहेत. याच कौतुक करत भारत गणेशपुरे यांनी पाण्याची येत्या काळातील गरज खास वैदर्भीय भाषेत सांगितली.
भारत गणेशपुरे म्हणाले की, "सध्या शेतकरी भयान परिस्थितीला समोरं जात आहे. मात्र या परिस्थिती एकटं न समजता बोलकं व्हावं, जेणेकरुन एकाकी पडणार नाही. आत्महत्या करुन काहीच साध्य झालं नाही, इतिहासात डोकावून पाहा. ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्याकडे पाहून परिस्थिती पाहा, समजा आणि मग निर्णय घ्या"
यावेळी मंचावर खासदार रामदास तडसही उपस्थित होते. त्यांनी आमीर खान यांच्या पानी फाऊंडेशनकडून सुरु असलेल्या कामाचं कौतुक केलं. शिवाय लोकांनी हे काम स्वत:साठी करत आहात ही भावना मनात ठेऊन एकजुटीने दुष्काळाशी दोन हात करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी आळंदीचे कीर्तनकार रामराम ढोक महाराज यांनीही लोकांचं प्रबोधन केलं आहे.