अहमदनगर : पुणे-पाटणा एक्स्प्रेसच्या प्रवाशांवर अॅसिड हल्ला करुन लुटण्यात आलं आहे. अॅसिड हल्ल्यापूर्वी त्यांना मारहाणही करण्यात आली.
या हल्ल्यात विश्वनाथ यादव, प्रकाश गुनकर आणि बुडक कोल गंभीर भाजले आहेत. त्यांच्या चेहऱ्याला, खांद्याला आणि पाठीला भाजलंय. बिहार आणि मध्यप्रदेशचे ते रहिवासी आहेत.
शनिवारी रात्री साडे अकरा वाजता श्रीगोंदा हद्दीत त्यांच्यावर अॅसिड हल्ला झाला. जखमी तिघेजण जनरल डब्यातून प्रवास करत होते. त्यावेळी दौंड रेल्वे स्थानकात बसलेल्या दोघांनी त्यांच्याशी बसण्यावरुन वाद घातला. त्यानंतर दमबाजी मारहाण करुन सोळाशे रुपये काढून अॅसिड हल्ला केला.
हल्ल्यानंतर जखमींवर मनमाड जिल्हा रुग्णालयात उपचार करुन नाशिकला दाखल केलं. दोघा अनोळखी व्यक्तींनी अॅसिड हल्ला केल्याचं प्रवाशांनी सांगितलं. या प्रकरणी रविवारी मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन नगरला गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. उपचारानंतर तिघेही गावाकडे रवाना झाले आहेत.
दौंड रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटल्यावर दहाच मिनिटात त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यानं प्रवाशांत गोंधळ उडाला आहे. रेल्वे प्रवाशांवरील अॅसीड हल्ल्यानं रेल्वेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.