जळगाव : जळगाव कारागृहात असताना बंदुकीचा धाक दाखवत पलायन केलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित आरोपी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. सुशील मगरे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस दलात असताना दरोड्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं आढळल्याने त्याला बडतर्फ करुन जळगावच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं.


25 जुलै 2020 रोजी सकाळी सुशील मगरेने कारागृहातील अन्य तीन कैद्यांच्या मदतीने कारागृहाच्या गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवत, साथीदारांसह पलायन केलं होत. या घटनेनंतर त्याच्यासोबत असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. मात्र बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेला आणि दरोड्यात सहभागी असलेल्या सुशील मगरे मोकाट असल्याने पोलीस खात्यावर मोठी टीका झाली होती. त्यातच मुळात गुन्हेगारी जगताशी हातमिळवणी केलेल्या सुशील मगरेकडून अजून गंभीर गुन्हे होण्याची शक्यता पाहता त्याला पकडणं आवश्यक होतं.


मगरे हा स्वतः पोलीस खात्यात काम केलेला असल्याने पोलिसनाच्या तपास करण्याची पद्धत त्याला चांगली माहित होती. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना चकवा देण्यात तो यशस्वी होत होता. गेल्या चार महिन्यांपासून कुटुंबापासून दूर असल्याने, एक दिवस तो घरी येईल या आशेवर पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. अखेर शनिवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्री सुशील हा आपल्या घरी आल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पहुर गाव इथल्या घरात छापा मारुन त्याला अटक केली. यावेळी पोलीस आल्याची कुणकुण लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पहूर पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यामुळे सुशील मगरेला आता पुन्हा कारागृहात जावं लागणार आहे.


पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची आणि घराची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक सुरा आणि गावठी कट्टा आढळून आला. त्यामुळे अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.