मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिल्या कार्यकारिणीची बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवसेना मुख्य नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत. त्यामुळे पक्षाचे सर्व अधिकार देखील त्यांच्याकडेच असणार आहेत. जसे याआधी शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. तर रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश रामदास कदम यांची शिवसेना सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाकडून एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार या समितीकडे असणार आहेत. या समितीत दादा भुसे, शंभुराजे देसाई ,संजय मोरे यांचा समावेश आहे. याबरोबरच कार्यकारिणीच्या बैठकीत काही निर्णय देखील घेण्यात आले.
ठाकरेंविना पहिलीच बैठक
बंडखोरीनंतर खरी शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगात दावा सुरू होता. मागच्या शुक्रवारी यावर निर्णय देत शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या देण्याच्या निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंच्या उपस्थितीविना ही बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदेना गटाचे प्रमुखपद बहाल करून त्यांना सर्वाधिकार प्रदान करण्यात आले.
शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
1) चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.
2) राज्यातील भूमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के स्थान देणे.
3) मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा देणार.
4) स्वातंत्र्यवीर सावरकरांना “भारतरत्न” देणे.
5) UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे.
महत्वाच्या बातम्या