धुळे : साक्री-पिंपळनेर मार्गावर तिहेरी अपघात, पाच जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2017 07:41 PM (IST)
धुळे : धुळ्यातील साक्री -पिंपळनेर मार्गावरील धाडणे फाट्यावर मिनी ट्रक, रिक्षा आणि दुचाकी असा तिहेरी अपघात झाला. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. धाडणे फाट्यावरील अपघातानंतर तीनही वाहनांनी पेट घेतला. सहा जखमींपैकी तिघांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित तीन जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासात विविध अपघातांमध्ये 12 जणांचा मृत्यू गेल्या चोवीस तासात धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरत-नागपूर महामार्गावर साक्रीजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला ओम्नी आदळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. भाडणे फाट्याजवळ दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. मुंबई -आग्रा महामार्गावरील कळमाडीजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. अन्य एका अपघातात साक्री-पिंपळनेर मार्गावरील धाडणे फाट्याजवळ झालेल्या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. सायंकाळच्या वेळेला धुळे शहराजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ झालेल्या अपघातात मालेगावकडून धुळ्याकडे येणारी सुमो डंपरवर आदळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये दहाहून अधिक प्रवास जखणी झाले आहेत.