Bombay After Ayodhya : एबीपी न्यूजचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांच्या 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' (Bombay After Ayodhya) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. मुंबई प्रेस क्लबमध्ये हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रकाशन सोहळ्याला मुंबईचे माजी निवृत्त पोलिस आयुक्त एम. एन सिंह यांच्यासह एबीपी न्यूजचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' या पुस्तकात अयोध्येमधील बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईतील वातावरण कसे बदल गेले? याबाबत सांगण्यात आले आहे. 


माजी पोलिस आयुक्त एम.एन.सिंह यांनी यावेळी बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर मुंबईतील परिस्थिती आणि पोलिस आयुक्त या नात्याने त्यांनी ती कशी हाताळली याबाबत माहिती दिली. याबरोबरच त्यावळी मुंबई पोलिसांनी कशी कामगिरी बजावली यासह या घनेनंतर अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम याने मुंबईत केलेल्या साखळी बॉम्बस्फोटाबाबत माहिती दिली. 


"दाऊद इब्राहिमसारख्या गुंडांना राजकारणी आणि समाजातील प्रभावशाली लोकांचा आश्रय मिळाल्यावर ते मोठे होतात. अनेक बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट निर्मात्यांचे त्याच्यासोबत संबंध होते, अशी माहिती माजी पोलिस आयुक्त एम. एन सिंह यांनी दिली. याबरोबरच पोलिस खात्यातील राजकीय हस्तक्षेपामुळे काही अधिकारी बदनाम होतात. समाजावर पकड ठेवण्यासाठी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करतात. यामुळे त्यांना मते मिळतात. अशावेळी पोलिस काय करू शकतात? परंतु, अशी प्रकरणं अंगलट आल्यानंतरच राजकारण्यांना जाग येते. अलीकडे तर मला असे ऐकायला मिळाले की, राजकारणी लोक गुंडांसोबत हातमिळवणी करून त्यांच्याकडून मालमत्ता विकत घेत आहेत, असा आरोप सिंह यांनी यावेळी केला. 


"जितेंद्र दीक्षित यांच्या पुस्तकातून मुंबईत गेल्या तीस वर्षात घडलेल्या अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रमोद महाजन खून प्रकरणाचा तपास पूर्ण होताच राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्यात जितेंद्र यांना यश आले. प्रवीण महाजन यांना त्यांच्या भावाला गोळ्या घालण्यास कारणीभूत असलेल्या सत्य परिस्थितीबद्दल या पुस्तकात माहिती देण्यात आलीय. हे पुस्तक वाचून कोणत्याही पुस्तकप्रेमीला एक पत्रकार म्हणून अनुभवलेल्या  मुंबईतील सर्व गोष्टींची माहिती मिळेल, असे कौतुक एबीपी न्यूजचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी केले. 


काय आहे 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' या पुस्तकात?
 
'बॉम्बे आफ्टर अयोध्या' या पुस्तकात अयोध्येमधील बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईतील वातावरण कसे बदल गेले? या घटनेनंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले आणि मुंबईतील लोकांनी ते कसे सहन केले? बॉम्बस्फोटाला मुंबईकर कसे समारे गेले? यासह  बाबरी मशिदीच्या विध्वंसानंत मुंबईत कशी परिस्थिती निर्माण झाली होती? याबाबत माहिती देण्यात आली आहे.