बीड : सलग तीन वर्ष दुष्काळाची दाहकता सोसणारं राडीतांडा गाव सध्या जलसाठ्यांची शीतलता अनुभवत आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या या गावात, जिथं नजर टाकावी तिथं पाणीच पाणी दिसत आहे. वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गावकऱ्यांनी घाळलेला घाम, जणू पावसाच्या रुपात पुन्हा बरसला आहे.
फक्त राडीतांडाच नव्हे, तर आमीर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गावांत अशी जलक्रांती घडली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा 15 ऑगस्टला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
116 स्पर्धक गावांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणारे 9 गावं अंतिम फेरीत पोहचली आहेत. त्यामध्ये बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा पाटोदा, कुंबेफळ आणि खापरटोनचा समावेश आहे. तर साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातली वेळू, जायगा आणि आनपटवाडी ही गाव अंतिम फेरीत पोहचली आहेत.
दुसरीकडे अमरावतीच्या वरुड तालुक्यातील वाटोदा आणि गव्हाणकुंड या गावांची अंतिम फेरीत वर्णी लागली आहे. अव्वल येणाऱ्या गावाला 50 लाख, दुसरा क्रमांक पटकवणाऱ्या गावाला 30 लाख तर तिसऱ्या क्रमांकावरच्या गावाला 20 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 15 ऑगस्टला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करणयात येईल.
आता 9 गावांपैकी कोण बाजी मारेल याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. मात्र स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक गावात दुष्काळाचा पराभव झाला हे मात्र नक्की.