दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतीसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचार संपल्यानंतर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. 


2. कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेची एसटी संपातून माघार, अजय गुजर यांचा निर्णय आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांना अमान्य, राज्यभरातल्या संपकरी कामगारांच्या भूमिकेकडे लक्ष
मागील जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेला राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यात या संपाने आता नवं वळण घेतलं आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेनं सोमवारी मंत्रालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून एसटी संप मागे घेतल्याचे जाहीरही केले. पण एसटी विलगीकरणाच्या मागणीच्या पूर्ततेशिवाय माघार घेतल्याने इतर संपकरी आक्रमक झाले असून हा संप अजूनही मागे घेतली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान गुजर यांनी संपातून माघार घेतल्याने संपात फूट पडल्याच्या चर्चेलाही उधाण आलं आहे.


3. उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत, तर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची खलबतं
उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. 22 ते 28 डिसेंबर यादरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे हे अधिवेशन अवघ्या पाचच दिवसांचे असणार आहे. अधिवेशन विविध मुद्यांवरुन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय.


4. ख्रिसमस सेलिब्रेशन ठरू शकतं घातक, अनेक देशांमध्ये निर्बंध लागू, भारतातही केंद्र सरकारकडून कठोर निर्बंध
देशात एकीकडे ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना लोक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. मात्र जगात काही देशांनी सतर्कता बाळगत ख्रिसमस आणि नवे वर्ष साजरं करण्यावर निर्बंध लावले आहेत. केंद्र सरकारने ख्रिसमस आणि नवं वर्ष साजरे करण्यावर निर्बंध लावले आहेत. 


5. मुलीचं लग्नाचं वय 18 वरून 21 करणारं विधेयक आज लोकसभेत मांडणार, तर मतदार सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर आज राज्यसभेत मांडणार
मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होऊ शकतो. कारण मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सरकार दरबारी हालचाली सुरु झाल्या आहेत. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.


6. टीईटी गैरव्यवहारप्रकरणी तुकाराम सुपेंचं निलंबन, सुपेंच्या घरातून आत्तापर्यंत तीन कोटींचा ऐवज जप्त, अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत
टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आलं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या दिवसापासून त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाकडून चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे.


7. पेपरफुटी प्रकरणात संजय सानपला अटक, संजय सानप पाटोद्यातील भारतीय जनता युवा मोर्चा माजी अध्यक्ष
आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी झाल्याच्या प्रकरणी यापूर्वीच बीड जिल्ह्यात कारवाई झालेली आहे आता भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. संजय सानप यांची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले संजय सानपला 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


8. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा आजही दहा अंशांखालीच, विदर्भ मराठवाड्यात हुडहुडी. उत्तर महाराष्ट्रही गारठला 
राज्यात तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झालीय. परभणीत पारा 7.6 अंशांवर घसरलाय. यंदाच्या मोसमातील हे नीच्चांकी तापमानाची नोंद झालीय. तर भंडारा जिल्ह्यातही पारा घसरलाय. जिल्ह्यात 9 अंश तापमानाची नोंद झालीय. त्याचबरोबर जिल्हात काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली..


9. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या SET नं तपास तुर्तास थांबवला; सूत्रांची माहिती
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा मुंबई पोलीस SET तयार करुन तपास करत होते. परंतु आता मुंबई पोलिसांनी चौकशी तुर्तास थांबवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतं आहे. 


10. भारत बायोटेकने मागितली नेझल वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी
भारत बायोटेकने ड्रग रेग्युलेटरकडे नाकामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. कंपनीने पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांसाठी बूस्टर डोस म्हणून या लसीचा अभ्यास करण्याची परवानगी कंपनीने मागितली आहे. सरकारी सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली.