Majha Katta: सध्याच्या राजकारणात दाढीची क्रेझ आहे, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्रीही दाढीवाले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आनंद दिघे यांनी त्यांच्या दाढीवरुन हात फिरवायचे आणि आम्हाला इशारा मिळायचा, मग कुणाचातरी करेक्ट कार्यक्रम व्हायचा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पिता-पुत्र आज एबीपी माझाच्या कट्ट्यावर आले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही आठवण सांगितली.


दाढीवरुन हात फिरवण्याच्या युनिक स्टाईलवरुन प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंद दिघे यांच्याकडे पाहून आम्हाला दाढीची क्रेझ वाटायची, त्यांची दाढी ही त्यांची ओळख होती. आनंद दिघेंनी त्यांच्या दाढीवरुन हात फिरवला तर आम्हाला इशारा मिळायचा, मग कुणाचा तरी करेक्ट कार्यक्रम व्हायचा. बाळासाहेब ठाकरेंनीही दाढी वाढवली होती, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील दाढीवाले आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकारणात दाढीची क्रेझ आहे. 


आई बॉस होती, तिला घाबरायचो


आई आमच्या घरात बॉस होती, तिला आम्ही सगळेच घाबरायचो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, दिवसभर मी लोकांची काम करायचो, आंदोलन करायचो. त्यावेळी आई मला म्हणायची की तुलाच हे कशाला पडलंय? त्यावेळी आईचे रट्टेही खाल्ले होते. 


मला काहीतरी व्हायचं आहे म्हणून मी कधीही काम केलं नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, काहीतरी मिळवायचं आहे म्हणून मी कधीही काम केलं नाही, जर तसं काम केलं तर आणि ती गोष्ट मिळाली नाही तर मात्र अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.  


श्रीकांतचा हा गुण आवडतो 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, श्रीकांतने जबाबदारी घेतली आणि त्यामध्ये झोकून देऊन काम करतोय. कल्याणच्या पत्री पुलाच्या कामावेळी तो पूर्णवेळ त्यामागे होता. तो एखाद्या कामाच्या मागे लागला तर तो पूर्ण करतोच. श्रीकांतचा हाच गुण आपल्याला आवडतो.  


लहानपणाची आठवण सांगताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, लहानपणी आजोबा आणि आई काम करायचे, आम्हीही घरी पॅकेजिंगचे काम करायचो. घरी खानावळ होती, आई रोज 56-60 लोकांचे जेवन करायचो. आमचं बालपण चाळीत गेलं, कष्ठाचे गेलं. बालपण आणि आताचा काळ हा पूर्ण वेगळा आहे. 


समाजकारण आणि राजकारणात विश्वास महत्त्वाचा असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. आपण प्रत्येकाचं निवेदन स्वीकारतो आणि प्रत्येकाचं काम कसं होईल याकडे लक्ष देतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लोकांना अशी कठीण वाटणारी कामं आपण स्वतः केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. काही कामं ही स्वतःचं करावी लागतात असंही ते म्हणाले. 


आपले वडील आहेत, मुलगा आणि नातू आहे, ही चौथी पीढी आहे, नातवासाठी मी पाच मिनिटे का होईना देतो, त्यामुळे ताण कमी होतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्याला शेतीची आवड असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गावाकडे जाऊन आजही शेतीची काम करत असल्याचं ते म्हणाले. 


एखादी गोष्ट अशीच कर, असं करू नकोस असं कधीच वडिलांनी सांगितलं नसल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. गेल्या 10 महिन्याचा काळ हा चढ-उताराचा आहे, भावना असतील तर आयुष्यातील ही फेज असतेच असंही ते म्हणाले. 


लोकांना वेळ देणं हे वडिलांकडून शिकल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, लोकांना जेवढा वेळ द्याल तेवढा त्यांचा विश्वास वाढतो. कितीही उंचीवरती पोहोचलो तरी लोकांना वेळ देणं हा शिंदे साहेबांचा स्वभाव आपल्याला आवडतो असं ते म्हणाले. 


प्रत्येक गोष्ट झोकून देऊन करतात, स्वतःवर घेऊन काम करतात मग ती बारिक असो वा मोठी, आताही मुख्यमंत्री असताना त्या गोष्टी शिंदे साहेब करतात. वयाच्या 16 व्या वर्षापासून साठी पर्यंत पोहोचले तरी हे काम सुरू आहे, थोडंसं तरी रिलॅक्स होणं महत्त्वाचं आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले. 


ही बातमी वाचा: