Majha Katta Adam Master:  राज्यात महाविकास आघाडी सोबत लढू...पण सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेसचा पराभव करू अशा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, (CPM) कामगार नेते आणि विडी कामगारांसाठी घरकुल योजना राबवणारे कॉम्रेड नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी दिला. एबीपी माझा कट्टावर आडम मास्तर यांच्याशी खास संवाद साधण्यात आला. एक जून रोजी आडम मास्तर यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. आडम मास्तर यांनी माझा कट्टावर बोलताना कामगार चळवळीतील संघर्षापासून ते कम्युनिस्ट पक्षातील दोष सांगत आत्मटीकाही केली. भाजपविरोधात महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. मात्र, डाव्या लोकशाही पक्षांनी गट स्थापन केला असून काही जागा सोडण्याची मागणी करणारे पत्र दिले असल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले. आम्ही महाविकास आघाडीच्या सतरंजी किती वेळ उचलाव्यात, असा सवालही त्यांनी केला.


आडम मास्तर यांनी सांगितले की, कम्युनिस्ट पक्षाच्या काही उणिवा राहिल्या आहेत. लोकांना राजकीयदृष्ट्या जागरुक केल्याशिवाय ज्यांसाठी संघर्ष करतोय असे घटक फार मतदान करणार नाहीत, असेही आडम मास्तरांनी म्हटले. आडम मास्तर यांनी कामगार चळवळीत काम करताना झालेले हल्ले, कामगार चळवळीचे अनुभवही सांगितले. 


गद्दारीला लोक विचारत नाहीत...प्रामाणिकपणा लक्षात ठेवतात...


कॉम्रेड नरसय्या आडम यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना राजकारणातील आयाराम-गयारामवरही भाष्य केले. आपल्याला पक्षाने तीन वेळेस कारवाई केली. पण माझी निष्ठा पक्षासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. लोक गद्दारीला जवळ करत नाही. तर, या उलट तुमच्या प्रामाणिकतेला किंमत देतात, असे त्यांनी म्हटले. आडम मास्तरांनी आपल्या पहिल्या आमदारकीच्या वेळी आलेला अनुभव सांगितला. त्यावेळी, शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील सरकार पाडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात हालचाली सुरू होत्या. वसंतदादा पाटील, प्रभा राव, प्रतिभाताई पाटील, जांबुवंतराव धोटे आदी 25 आमदार माझ्या खोलीवर आले. त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माझ्यावर कारवाई केली होती. माझ्या पक्षाने केलेल्या कारवाईमुळे भविष्यात राजकारणात जागा नसणार अशी भीती या गटाने दाखवली. पवार यांचे सरकार पाडण्यासाठी चार आमदारांची आवश्यकता होती. त्यावेळी सरकार पाडण्यासाठी मदत करा असे आवाहन केले. आपण त्यावेळी ही ऑफर नाकारली असल्याचे आडम मास्तरांनी सांगितले. ही माहिती मुख्यमंत्री शरद पवार यांना समजताच त्यांनी जेवण्यासाठी घरी बोलावले. जेवणानंतर त्यांनी राज्यमंत्री पदाची ऑफर दिली. मात्र, आमच्या पक्षाने बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यामुळे पक्षाने माझ्यावर कारवाई केली असली तरी पक्षाचा आदेश मानणार असल्याचे मास्तरांनी सांगितले. त्यावेळी शरद पवार यांनी माझ्या भूमिकेचे कौतुक करत भविष्यात मदत लागली तर सांगा असे म्हटले आणि भविष्यात तो शब्द पाळला असल्याची आठवण आडम मास्तरांनी सांगितली. 


जेव्हा शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधानांना घेरले


सोलापूरमध्ये नरसय्या आडम यांच्या पुढाकाराने 10 हजार विडी कामगारांसाठी घरकुल उभारले आहे. मात्र, त्यासाठी बराच संघर्ष करावा लागला असल्याचे आडम मास्तरांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय कामगार मंत्र्यांनी घरकुल योजनेला मदत करण्यास नकार दिला. त्यावेळी ही बाब शरद पवार यांच्या कानावर घातली. तेव्हा पवारांनी दिल्लीत बोलावून घेतले. दुसऱ्या दिवशी लोकसभेतील कार्यालयात आणण्याची सूचना त्यांनी सचिवाला दिली. लोकसभेत शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी आदी राज्यातील खासदारांसह मुलायम सिंह यादवांना घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. वाजपेयी यांनी अचानक खासदारांनी एवढं कसं काय घेरले असा मिश्किल सवाल केला. त्यावेळी पवार यांनी प्रश्न समजावून सांगितला. अखेर वाजपेयी यांनी कामगार मंत्र्याला बोलावत तातडीने फाईल मंजूर करण्याची सूचना केली असल्याची आठवण आडम मास्तरांनी सांगितली. सोलापुरात 10 हजार घरांचे घरकुल उभं राहिलं, त्यात शरद पवार यांनी केलेल्या मदतीचा वाटा असल्याचे प्रांजळपणे आडम मास्तरांनी सांगितले. 


PM मोदींच्या विचारणेनंतर राज्य सरकार हललं


महाविकास आघाडीच्या काळात पंतप्रधान मोदी देहू येथील कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूरमधील रे नगर घरकुलांतील पायाभूत सुविधेचं काय झालं अशी विचारणा केली. त्याच संध्याकाळी अजित पवार यांनी आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी मंत्रालयात बैठक घेऊन निधीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी देत 300 कोटी दिले असल्याची आठवण आडम मास्तरांनी सांगितली.  रे नगरमधील पायाभूत सुविधेसाठी वर्षभर सरकारसोबत चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी लक्ष दिले नव्हते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


प्रस्ताव मान्य नसल्यास, सोलापुरात काँग्रेसचा पराभव करू....


सोलापूर शहरात काँग्रेस हाच आमचा मुख्य प्रतिस्पर्धी असल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले. आडम मास्तरांनी तीन वेळेस प्रतिनिधीत्व केलेला मतदारसंघ पुनर्रचनेत इतर मतदारसंघात विलीन झाला. सुशिलकुमार शिंदे यांनी मुलगी प्रणितीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याआधी आमचे संबंध चांगले होते. मात्र, त्यांनी निवडणुकीत केलेल्या खोट्या आरोपांमुळे आपण दुखावलो असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीसोबत राहू पण सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसला पाडू असेही त्यांनी सांगितले. त्याच वेळी आडम यांनी लोकसभेला प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांना मदत करू आणि त्याबदल्यात काँग्रेसने शहर मध्यमध्ये आपल्याला मदत करावी असा प्रस्तावही ठेवला.