NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत मोठी घोषणा आज शरद पवारांनी दिल्लीत केली. पक्षाच्या वर्धापन दिनाचं निमित्त साधत दोन कार्याध्यक्ष नेमले गेलेत..दादा की ताई या प्रश्नाचं उत्तरही यानिमित्तानं पवारांनी दिलंय का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीच...राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रथमच कार्याध्यक्ष पदाची घोषणा झाली..आणि एकाचवेळी ती जबाबदारी दोघांवर सोपवली गेली आहे...प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर..त्यामुळे पक्षांतर्गत ज्या भविष्यातल्या वाटचालीची चर्चा सुरु होती, त्यावरच आज पवारांनी शिक्कामोर्तब केलं..राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा स्थापना दिवस साजरा होतोय..आणि त्याच मुहूर्तावर शरद पवारांनी ही घोषणा केली...दोन कार्याध्यक्ष नेमताना दोघांवर जी जबाबदारी दिलीय तीही महत्वपूर्ण आहे...राज्यांची जबाबदारी देताना महाराष्ट्र हे राज्य सुप्रिया सुळेंकडे असणार आहे.
राष्ट्रवादीत कुठल्या कार्याध्यक्षांकडे काय जबाबदारी
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा आणि राज्यसभा कामकाजाची जबाबदारी असणार आहे..सोबत आर्थिक घडामोडींचे अध्यक्षही म्हणून त्यांना जबाबदारी आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला, युवा, विद्यार्थी संघटना आणि लोकसभेच्या कामकाजाची जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे केंद्रीय निवडणूक अधिकार समितीच्या अध्यक्षही असणार आहेत. साहजिकच महाराष्ट्रातल्या निर्णयांमध्ये यानिमित्तानं सुप्रिया सुळेंचा अधिकार चालताना दिसू शकतो.
आज ही घोषणा होत असताना सगळ्यात विशेष गोष्ट होती..सुप्रिया सुळेंची अनुपस्थिती, आणि अजित पवार मात्र दिल्लीत होते..एरव्ही क्वचितच दिल्लीत दिसणारे अजितदादा आज या कार्यक्रमासाठी होते तर ताई मुंबईत होत्या.. त्यांच्या नेहमीच्या भूमिकांमधला हा बदल जाणवणारा होता...त्यामुळे दादांनी दिल्लीत त्यावेळी हजर असावं ही नेपथ्यरचना जाणीवपूर्वक केली गेली होती का असाही प्रश्न आहे.
या मोठ्या घोषणेवेळी व्यासपीठावरचे अजितदादा मात्र नंतर माध्यमांशी काही न बोलताच निघून गेले. नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राष्ट्रवादीनं गमावला आहे, साहजिकच नव्या कार्याध्यक्षांपुढचे आव्हान खडतर आहे. 2 मे ते 10 जून...गेल्या महिनाभराचा कालखंड राष्ट्रवादीत प्रचंड घडामोडींचा राहिला आहे. शरद पवारांनी त्यावेळी राजीनामा तर मागे घेतला..पण सोबत वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन कार्याध्यक्ष नेमत भविष्यातल्या नेतृत्वाची दिशाही स्पष्ट केलीय.