बीड : वनवे दाम्पत्याने चारी मुलींना डॉक्टर करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. मात्र, यातील दोन जुळ्या मुलींना डॉक्टर करण्यासाठी मदतीची गरज असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. या बातमीची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या दोन्ही मुलींच्या वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.


रोहतवाडी येथील प्रभाकर आणि संगीता वनवे यांना चार मुली आहेत. यातील पहिल्या दोन मुली सध्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आहेत. केवळ पाच एकर जमिनीवर आपल्या कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या प्रभाकर वनवे यांनी दोन एकर जमीन मुलींच्या शिक्षणासाठी विकली आहे.


निकिता आणि प्रणिता या दोन जुळ्या बहिणी देखील आता डॉक्टर बनणार आहेत. निकीताला नीटच्या परीक्षेत 540 गुण मिळाले आहेत. तिचा श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे इथे नंबर लागला आहे. तर प्रणिताला 527 गुण मिळाले आहेत. प्रणिताचा SSPM मेडिकल कॉलेज कुडाळ सिंधुदुर्ग येथे नंबर लागला आहे.


छोट्याशा किराणा दुकानावरती वनवे कुटुंबीय आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. यातून आधीच दोन मुलींच्या वैद्यकीय शिक्षण चालू असताना आता आणखी दोन मुलींना वैद्यकीय शिक्षण देणं मोठं आव्हानाचे होते. त्यामुळेच या दोन मुलींना डॉक्टर बनण्यासाठी समाजाच्या मदतीची गरज होती. धनंजय मुंडे यांनी या दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.


एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी या बातमीची दखल घेऊन कुटुंबीयांशी संपर्क केला होता. राजश्री मुंडे यांच्या प्रयत्नातूनच या दोन मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था झाली आहे. पोटी चारही मुली झाल्या म्हणून संगीता वनवे यांना लोकं नाव ठेवायचे. मात्र, प्रभाकर आणि संगीता वनवे यांनी या चारही मुलींना डॉक्टर करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.


Special Report | शेतकरी कन्यांची प्रेरणादायी कहाणी! मुलींच्या उच्च शिक्षणासाठी 3 एकर शेती विकली