अहमदनगर : कोपर्डीच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर बंद करण्यात आलेली बस सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर कर्जत ते श्रीगोंदा बस कोपर्डीवरुन नेण्यात येणार आहे.
कोपर्डीत बस दाखल झाल्यानंतर विद्यार्थी आणि ग्रामस्थांना श्रीफळ वाढवून बसचं स्वागत केलं. कोपर्डीत चौथीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कुळधरणला जावं लागतं.
अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर, तसंच या मार्गावर गायरान असल्यामुळे शाळेत जायला विद्यार्थी घाबरत होते. मात्र, आता बस सुरु झाल्यानं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
कोपर्डीच्या घटनेनंतर भीतीपोटी अनेक मुलींनी शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे श्रीगोंद्याहून कुळधरण, कोपर्डी आणि पुढे शिंदा अशी बस सुरु करण्यात आली होती. मात्र 29 तारखेला कोपर्डीचा निकाल लागताच, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 तारखेलाच महामंडळानं ही बस कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केली होती.
बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचं वृत्त एबीपी माझाने दाखवलं होतं. या वृत्ताची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाने त्वरित कोपर्डीला भेट दिली होती. त्यानंतर आता ही बस पुन्हा सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या :
कोपर्डीचा निकाल लागताच श्रीगोंदा ते कोपर्डी बससेवा बंद