ABP Majha Exclusive : औरंगाबाद : जवळपास अर्धा महाराष्ट्र कोरोनाच्या लशीपासून वंचित आहे. लाखो जणांची सकाळ लशीच्या रांगेत सुरु होते. तरी देखील त्याला डोस मिळेल याची शाश्वती नसते. काही जणांना परवडत नसतानाही पदरचे पैसे मोडून खाजगी केंद्रावर लस घ्यावी लागतेय. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना लशीचा सर्रास काळाबाजार सुरु आहे. एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यानं लशीचा काळाबाजार (Corona Vaccine Black Marketing Aurangabad) करणाऱ्यांना कैद केलं आहे.
तुमच्या आमच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारणाऱ्यांमध्ये सरकारी कर्मचारीच आघाडीवर आहे. औरंगाबादमध्ये त्याचं एक उदाहरण समोर आलंय. दररोज सरकारी लसीकरण केंद्रावरच्या 30 ते 40 लसी चोरून, त्याची चोरीछुपे विक्री करणारा गणेश दुरोळे एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरलेल्या लशीची विक्री करण्यासाठी गणेश दुरोळे काही कामगारांना एका खोलीत बोलवत असे. आणि 300 रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येकाला लस टोचत असे. हे तर फक्त औरंगाबादचं उदाहरण समोर आलं असेल. असा काळाबाजार, तुमच्या आमच्या, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असल्याची शंका व्यक्त करण्यात येतेय. एबीपी माझानं केलेल्या या स्टिंग ऑपरेशनुमळं लशींचा काळाबाजार आता चव्हाट्यावर आला आहे.
Corona Vaccine Black Marketing Aurangabad : कोरोना लसींचा काळाबाजार,'माझा'चं स्टिंग ऑपरेशन EXCLUSIVE
औरंगाबादच्या वाळूजजवळच्या साजापूरमधला आरोग्य सेवक गणेश दुरोळे लशी चोरुन त्याची विक्री करत होता. दरम्यान एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या गणेश दुरोळेला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
स्टिंग ऑपरेशननंतर अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. लस चोरुन त्याची विक्र करणारा आरोग्य सेवक गणेश दुरोळे हा तर छोटा मासा आहे, त्याच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात? लशीच्या काळाबाजारातले मोठे मासे कोण आहेत? हे रॅकेटची पाळमुळं कुठवर पसरली आहेत? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान औरंगाबादमधला प्रकार हे हिमनगाचं टोक असू शकतं... महाराष्ट्रभर लशीचा काळाबाजार सुरु असू शकतो अशी शक्यता पुण्यातले सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे.