अहमदनगर : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये 'पानी फाऊंडेशन'च्या कामांना भेट दिली. जोगेवाडीत पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं हाती घेण्यात आली आहेत.


जोगेवाडीत आमिर आणि किरण यांचं आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आमिरशी हस्तांदोलन करण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती. किरणनेही महिला, लहान मुलांशी संवाद साधला.

'गाव बंद श्रमदान कर', हा नारा देत ग्रामस्थ श्रमदान करत आहेत. घराला टाळं ठोकून आबालवृद्ध श्रमदानाला लागले आहेत. लहान मुलांसह महिलाही मोठ्या उत्साहात जलसंधारणाची कामं करत आहेत.



जोगेवाडीत 45 दिवस नागरिक जलसंधारणाच्या ठिकाणी तळ ठोकून राहणार आहेत. गावातील महिलांनी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. दोन ते अडीच हजार लोकसंख्येचं हे गाव असून बीड जिल्ह्याच्या सीमेला आहे. हे गाव चहूबाजूंनी डोंगरानं वेढलं आहे, मात्र इथे पाणीटंचाई असल्यामुळे ऊस तोडणी मजुरांची संख्या मोठी आहे.
पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या नव्या पर्वाला सुरुवात

गेल्या तीन दिवसांपासून आठशे ते नऊशे ग्रामस्थांनी श्रमदानाला सुरुवात केली. त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या असली तरी पावसाळ्यात मात्र हे गाव पाणीदार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आमिरने ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं. या पद्धतीने काम सुरु राहिल्यास राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल.  याचा राज्याला आणि पुढच्या पिढीलाही फायदा होणार असल्याचं आमिरने सांगितलं.